धावत्या दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, रेल्वेस्टशेन उड्डाणपुलावरील घटना
By राम शिनगारे | Updated: March 31, 2023 21:22 IST2023-03-31T21:21:52+5:302023-03-31T21:22:00+5:30
वेदांतनगरमध्ये गुन्हा दाखल

धावत्या दुचाकीवरील महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, रेल्वेस्टशेन उड्डाणपुलावरील घटना
छत्रपती संभाजीनगर : आतापर्यंत पायी रस्त्याने चालत जात असलेल्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरण्यात येत होते. मात्र रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावर पतीसोबत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या पत्नीच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावले. हा प्रकार २० मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता घडला. या प्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वेदांतनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर दिनेश राजानी (रा. गांधीनगर, बन्सीलालनगर) हे पत्नी मंजु राजानी व एक वर्षाच्या बाळसह महानुभव आश्रम चौकाकडून रेल्वे स्टेशन चौकाकडे जात होते. रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरून खाली उतरत असताना शासकीय मुद्रालणालयासमोर पाठीमागुन दुचाकीवर आलेल्या दोघांनी राजानी जवळ दुचाकी आणली. धावत्या दुचाकीवरील रस्त्यावर मंजु यांच्या गळ्यात चोरट्यांनी हात घातला. जबरदस्तीने गळ्यातील दोन तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले. हे मंगळसूत्र चोरट्याच्या हातात येताच त्यांनी त्यांच्याकडील दुचाकीवरून धुम ठोकली. या प्रकारामुळे घाबरलेल्या समीर राजानी यांनी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला. अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल कंकाळ करीत आहेत.
...तर सर्वच जखमी झाले असते
दुचाकीवरून जात असलेल्या दांम्पत्याच्या जवळ एक वर्षाचे बाळ होते. धावत्या दुचाकीवरून मंगळसूत्र हिसकावल्यामुळे जोरात तिघेही खाली पडले असते. मात्र, त्यांनी तोल सांभाळल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.