लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील व्यवस्थापन परिषदेच्या दोन जागांसाठी येत्या १२ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. विद्या परिषद सदस्यांमधून हे दोन सदस्य निवडले जाणार आहेत. या संदर्भात कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या मान्यतेने निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम कलम ३० (४) (आय) अंतर्गत विद्या परिषदेमधून दोन सदस्य निवडले जातात. या निवडणुकीसाठी दिनांक २२ ते ३० जानेवारी दरम्यान नामांकन दाखल करण्यात येणार आहेत. दिनांक १ फेब्रुवारी रोजी छाननी होईल. विद्या परिषदेच्या १२ फेब्रुवारीला होणाऱ्या बैठकीत दुपारी १२ ते २ या दरम्यान मतदान होईल. त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी कळविले आहे.