भूखंडाच्या हिश्यापोटी वकिल भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्यास जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 19:50 IST2025-08-14T19:41:56+5:302025-08-14T19:50:02+5:30
घटनेच्या काही महिन्यांपूर्वी त्याने बिडकीन येथील प्लॉट विकून पैसे दे, नाहीतर जीव घेईन अशी धमकी सूर्यप्रकाश यांना दिली होती.

भूखंडाच्या हिश्यापोटी वकिल भावाचा चाकूने भोसकून खून करणाऱ्यास जन्मठेप
छत्रपती संभाजीनगर : भूखंडाच्या हिश्यापोटी घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये दे म्हणत धाकट्या वकिल भावाची चाकूने भोसकून निर्घुण हत्या केल्याप्रकरणात आरोपी वेदप्रकाश रामनाथ ठाकुर (५८, रा. यशवंतनगर, पैठण) याला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी गुरुवारी जन्मठेप आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या प्रकरणात मृत ॲड. सुर्यप्रकाश रामनाथ ठाकुर (५३, रा. परितोष विहार, अशोकनगर, गारखेडा परिसर) यांची पत्नी आशा ठाकुर (३२) यांनी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. मृत सुर्यप्रकाश यांचा मोठा भाऊ तथा आरोपी वेदप्रकाश हा आर्थिक अडचणीमुळे वारंवार पैशांची मागणी करीत होता. घटनेच्या काही महिन्यांपूर्वी त्याने बिडकीन येथील प्लॉट विकून पैसे दे, नाहीतर जीव घेईन अशी धमकी सूर्यप्रकाश यांना दिली होती. याबाबत सुर्यकांत यांनी पैठण पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती.
दरम्यान २४ जुलै २०२० रोजी सकाळी सुमारे ८:३० वाजता आरोपी वेदप्रकाश हे मृत भावाच्या घरी आले. घर घेण्यासाठी दोन लाखांची मागणी करत त्यांच्यात वाद झाला. फिर्यादी काही वेळासाठी दूध आणण्यासाठी शेजारी गेल्या असताना आरोपीने धारदार हत्याराने सूर्यप्रकाश यांच्यावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने रक्तमाखले कपडे बदलून मृताचे कपडे घालून घटनास्थळावरून पळ काढला. सुर्यकांत यांना बुशुद्ध अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. प्रकरणात जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सहाय्यक निरीक्षक श्रद्धा वायदंडे यांनी तपास करुन याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणीवेळी अतिरिक्त सरकारी लोकाभियोक्ता सुनिलकुमार बर्वे आणि सुर्यकांत सोनटक्के यांनी २७ साक्षीदार तपासले. सुनावणीअंती न्यायालयाने आरोपी वेदप्रकाश ठाकुर याला दोषी ठरवून भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप, २ हजार रुपये दंडाची शिक्षा. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याचा साध्या कारावास भोगावा लागेल असे आदेशात नमूद केले. प्रकरणात पैरवी अधीकारी म्हणून हवालादर जे.बी. दीक्षित, आणि अंमलदार दसरे यांनी काम पाहिले.