कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 14:56 IST2025-10-18T14:55:47+5:302025-10-18T14:56:55+5:30
कन्नड उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार, चौकशी अन् कारवाईची मागणी

कन्नडमध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार; ३ आधार क्रमांक वापरून शेकडो मतदारांची हेराफेरी!
- प्रविण जंजाळ
कन्नड : नगर परिषदेच्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गैरप्रकार करण्यात आला आहे. अवघ्या ३ आधारकार्ड नंबरचा वापर करून शेकडो मतदारांच्या नावांची हेराफेरी करण्यात आली, असा आरोप माजी नगरसेवक संतोष पवार आणि पंकज सुरे यांनी केला आहे. यासंबंधी चौकशी करून याद्या दुरुस्त कराव्यात, तसेच संबंधितांवर कारवाईची मागणीही सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.
नगरपरिषद निवडणुकीसाठी ८ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रचंड गैरप्रकार असल्याचा आरोप केला जात आहे. यादीमध्ये एकाच पत्त्यावर शेकडो मतदारांची नावे नोंदविण्यात आली असून वॉर्ड क्र.३ मध्ये केवळ तीन आधार क्रमांकांचा (६८९९ ९०४७ ४७५७, ५४६६ १९५० ९१३२ व ४६०७ ०२४४ ६१४२) वापर करून अनेक मतदारांचा वॉर्ड, यादी बदलण्यासाठी अर्ज करण्यात आला, असे पवार व सुरे यांनी सांगितले.
तसेच काही ठिकाणी एकाच पत्त्याचे वेगवेगळे पुरावे जसे की, आधार कार्ड, वीजबिल, पाणीपट्टी यांचा वापर करून बेकायदेशीररीत्या मतदारांची नावे जोडली गेल्याचेही पवार म्हणाले. या सर्व प्रकारामुळे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, मतदार नोंदणीसाठी बेकायदेशीरपणे वापरलेल्या पत्त्यांवरील घरमालकांविरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच संबंधित मतदारांची नावे रद्द करण्यात यावीत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मोठ्या प्रमाणात गैरप्रकार
कन्नड न.प.च्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केलेला आहे. तीन आधार कार्ड क्रमांकांचा वापर करून शेकडो नावांचे वॉर्ड बदलासाठी अर्ज केलेले आहेत. याची चौकशी व्हावी.
- संतोष पवार, तक्रारदार तथा माजी नगरसेवक
...तर कारवाई
प्रारूप यादीवर नोंदवलेल्या प्रत्येक आक्षेपाची मोक्यावर जाऊन पडताळणी केली जाईल. तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- प्रशांत काळे, नायब तहसीलदार