औरंगाबादेत जास्त रुग्णांची ठिकाणे कन्टेनमेंट झोन बनवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 12:14 IST2021-03-25T12:12:21+5:302021-03-25T12:14:01+5:30
corona virus in Aurangabad परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दिले.

औरंगाबादेत जास्त रुग्णांची ठिकाणे कन्टेनमेंट झोन बनवा
औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूग्ण आढळत आहेत तो भाग ‘कन्टेनमेंट झोन’ बनवून त्याठिकाणी नियमांचे कडकपणे पालन करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या सूचना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी बुधवारी दिले. यात महत्त्वाचे म्हणजे शहरात अद्याप एकही कन्टेनमेंट झोन केलेला नाही.
जिल्हाधिकारी कार्यालयात कोराना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत शिंदे बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह सर्व संबंधित नोडल अधिकारी, संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते. जिल्ह्यातील वाढती रूग्णसंख्या वेळीच रोखण्यासाठी तातडीने आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात याव्यात, असे निर्देशित करून बाधितांच्या संपर्कातील व्यक्ती, अतिजोखीम तसेच कमी जोखमीच्या व्यक्ती या सर्वांच्या चाचण्यांमध्ये वाढ करावी. प्रति बाधित व्यक्तीमागे १० जणांच्या चाचण्या कराव्यात, सर्व रूग्णालयांनी गंभीर रूग्णांसाठी खाटा रिक्त ठेवणे नियमानुसार आवश्यक आहे.
ज्याठिकाणी गरज नसलेल्या रूग्णांना अतिदक्षता विभागात दाखल केल्याचे आढळून येईल, अशा रूग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या. तसेच मृत्यू झालेल्या रूग्णांच्या प्रवेशापासून त्या रूग्णांवर करण्यात आलेल्या उपचारांबाबतच्या सर्व माहितीचे विश्लेषण करून अहवाल सादर करावा. त्याचसोबत रूग्णांबाबतची उपचार सुविधा, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबतची माहिती नियमितपणे अद्ययावत करून संकेतस्थळावर अपलोड करावी, अशा सूचना केल्या.
प्रशासकीय प्रमुखांनी केलेले दावे असे
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत असून, घाटी येथील प्रयोगशाळेची अडीच हजार तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रयोगशाळेची दरदिवशी पंधराशे स्वॅब नमुने तपासणीची क्षमता असल्याचे सांगितले. मनपा आयुक्त पाण्डेय यांनी १०४ चाचणी केंद्र सुरू केली आहेत. त्यात शहरात ३८ आणि ग्रामीण भागामध्ये ६६ केंद्रांवर कोरोना चाचण्या करण्यात येत असल्याचे सांगितले. दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग वाढत असल्याचे डॉ. गोंदावले यांनी सांगितले.