‘मजीप्रा’ नोकरभरतीत मोठा बदल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी पदवीधारकही पात्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 13:56 IST2025-12-19T13:55:32+5:302025-12-19T13:56:02+5:30
खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणी दरम्यान शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल केला असल्याचे निवेदन सादर

‘मजीप्रा’ नोकरभरतीत मोठा बदल, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी पदवीधारकही पात्र
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील विविध पदांच्या भरतीपैकी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी पदवीधारकसुद्धा पात्र असतील, असा शैक्षणिक अर्हतेत बदल केला असल्याचे निवेदन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणीदरम्यान करण्यात आले. ते लेखी हमी म्हणून स्वीकारत न्यायमूर्ती विभाग कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांनी याचिका निकाली काढली. परिणामी वरील पदासाठी यांत्रिकी पदवीधारकसुद्धा पात्र समजले जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची गुरुवारी (दि. १९) शेवटची मुदत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे होणाऱ्या नोकरभरतीमध्ये कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या समकक्ष पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक अर्हता निश्चित केली होती. कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदासाठी पदविका पदवी आणि तत्सम उच्चशिक्षित उमेदवार पात्र असतील तर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठी पदविकाधारक उमेदवार पात्र असेल असे जाहिरातीमध्ये म्हटले होते.
यामुळे नैसर्गिक न्याय तत्त्वांचा राज्यघटनेच्या कलम १४, १६ आणि कलमांचे उल्लंघन होत असल्यामुळे अब्दुल फरहान अब्दुल हमीद व इतर तीन अभियंत्यांनी ॲड. राहुल प्रकाश धडसे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. सुनावणीदरम्यान प्रतिवादींनी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी पदासाठीच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल केला असून यांत्रिकी पदवीधारक आणि तत्सम उच्चशिक्षित उमेदवार वरील पदासाठी पात्र असतील असे निवेदन खंडपीठात केले.