महावितरणचा ७४० ग्राहकांना ‘शाॅक’, थकबाकीमुळे वीजपुरवठा केला खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 12:03 IST2024-12-31T12:02:46+5:302024-12-31T12:03:09+5:30
धडक मोहीम सुरू : वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे मुख्य अभियंता उतरले रस्त्यावर

महावितरणचा ७४० ग्राहकांना ‘शाॅक’, थकबाकीमुळे वीजपुरवठा केला खंडित
छत्रपती संभाजीनगर : वीजबिल वसुलीसाठी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. या धडक मोहिमेत छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. थकबाकीमुळे सोमवारी दिवसभरात शहरातील ७४० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. अनेक ग्राहकांनी लगेचच बिल भरून वीजपुरवठा सुरळीत करून घेण्यावर भर दिला.
वीज बिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचारीही मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी जात आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरत आहेत, तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.
अनधिकृतरीत्या वीज वापरली तर कारवाई
थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरीत्या वीज वापरत असेल, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी वीजग्राहकांनी आपली वीज बिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
नक्षत्रवाडी, सिटी चौकात पोहोचले मुख्य अभियंता
शहरात नक्षत्रवाडी व सिटी चौक शाखा कार्यक्षेत्रात सोमवारी राबवण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेत मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी या मोहिमेत ग्राहकांना भेट देऊन वीजबिलांची वसुली केली. ग्राहकांना वीज बिलाबाबत असलेल्या शंकांचे तत्काळ निरसन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बिल दुरुस्त करून त्यांना जागेवरच ऑनलाइन भरण्यास महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले.
काही ग्राहकांचे थेट मीटरच काढले
ज्या ठिकाणी ग्राहकास वीजबिल ऑनलाइन भरण्यास अडचण होती किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नव्हते त्यांच्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिलाची रक्कम स्वीकारून ॲपद्वारे वीजबिल भरणा करून घेतला. त्यांना बिल भरल्याचा तत्काळ मोबाइलवर एसएमएस पाठवण्यात आला. अनेक दिवसांपासून बिले न भरणाऱ्या काही ग्राहकांचे थेट मीटरच काढून आणण्यात आले.