महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 25, 2025 19:50 IST2025-01-25T19:49:12+5:302025-01-25T19:50:31+5:30

महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली.

Maharashtra State Lottery makes 5 people from Chhatrapati Sambhajinagar millionaires; Now 'Shani' is in the lottery horoscope | महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’

महाराष्ट्र राज्य लॉटरीने छत्रपती संभाजीनगरचे ५ जण करोडपती; आता लॉटरीच्या कुंडलीतच ‘शनी’

छत्रपती संभाजीनगर : मागील ५५ वर्षांत जिल्ह्यातील ५ जणांना करोडपती बनविणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या कुंडलीत आता ‘शनी’ आला आहे. नशिबाचा हा खेळ आता बंद होण्याच्या मार्गावर आहे.

मागील १० वर्षांत २ जण करोडपती
महाराष्ट्र राज्य लॉटरीची सुरुवात १२ एप्रिल १९६९ ला झाली. तेव्हापासून आजपर्यंत मागील ५५ वर्षांत जिल्ह्यात या लॉटरीमुळे ५ भाग्यवंतांना प्रत्येकी एक कोटीची लॉटरी लागली. मागील १० वर्षांत त्यातील २ जण करोडपती ठरले. २०१७ व २०२३ या वर्षी जिल्ह्यातील दोन भाग्यवान विजेत्यांना एक कोटीची दसरा-दिवाळी बंपर लॉटरी लागली.

एप्रिलनंतर प्रिंटिंगच्या ऑडर बंद
अनेकांना करोडपती बनविणाऱ्या महाराष्ट्र राज्य लॉटरीला आता घरघर लागली आहे. दोन महिने आधीच तिकिटांची प्रिंटिंग होत असते. यंदा एप्रिलपासूनच्या ऑडर सरकारकडून मिळाल्या नाहीत. यामुळे लॉटरी बंद होणार, असे संकेत मानले जात आहेत.

२८ टक्के जीएसटी, लवचिक धोरणाचा अभाव
१) २००३ पर्यंतचा काळ महाराष्ट्र राज्य लॉटरी व्यवसायाचे सुवर्णयुग होते.
२) २००४ नंतर ऑनलाइन लॉटरीचे युग आले.
३) परराज्यातील ऑनलाइन लॉटरीने बाजारपेठेवर कब्जा केला.
४) २०१७ पासून लॉटरीवर २८ टक्के जीएसटी लागला.
५) परराज्यातील ऑनलाइन लॉटरीच्या जागी पुन्हा तिकीट अवतरले.
६) एक-दोन आकडी लॉटरी बंदे होऊन चार अंक जुळले तरच लॉटरी लागायची.
६) न विकलेले लॉटरी तिकीट अन्य राज्य विक्रेत्यांकडून वापस घेतात.
७) पण न विक्री झालेले महाराष्ट्र राज्य लॉटरीचे तिकीट विक्रेत्यांकडून वापस घेत नाही.
७) वाढीव जीएसटी व धोरणात लवचिकपणा नसल्याने महाराष्ट्र राज्य लॉटरीचा खेळ बिघडला.
८) व्यवसाय कमी झाल्याचे कारण दाखवित महाराष्ट्र राज्य लॉटरी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या

जिल्ह्यात दसरा-दिवाळीदरम्यान दररोज ३० लाखांची उलाढाल
जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य लॉटरीची दररोज ५ ते १० लाखांची उलाढाल होते. महाराष्ट्र दिन १ मे, तसेच गणेशोत्सव, दसरा-दिवाळी, नाताळ बंपर लॉटरी दरम्यान दररोज २५ ते ३० लाखांची उलाढाल होत असते. तसे परराज्यातील लॉटरी मिळून जिल्ह्यात दररोज ५० लाखांची उलाढाल होत असते.

१०० लॉटरी विक्रेत्यांच्या ‘नशिबा’चा प्रश्न
आजघडीला महाराष्ट्र राज्य लॉटरी सोबत नागालँड, सिक्किम, पंजाब, गोवा या राज्यांच्या लॉटरी चालू आहेत. जिल्ह्यात एकूण ५००च्या जवळपास लॉटरी विक्रेते आहेत, तर २ होलसेलर आहेत. यातील १०० लॉटरी विक्रेते अन्य राज्यांतील लॉटरी सोबत महाराष्ट्र राज्य लॉटरी विकतात. ही महाराष्ट्र लॉटरी बंद पडली, तर त्यांचा व्यवसाय ३० ते ४० टक्क्याने कमी होईल. राज्यातील २० हजार लॉटरी विक्रेत्यांच्या रोजगारावर गदा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महाराष्ट्र सरकारला का परवडत नाही?
परराज्यात लॉटरी व्यवसाय करोडो रुपयांचा महसूल देत असताना महाराष्ट्रात लॉटरी व्यवसाय बंद पाडण्याचे कारस्थान रचले जात आहे. राज्य लॉटरीची योग्य प्रकारे जाहिरात केली तर यातून सरकारचा महसूल वाढेल आणि व्यवसाय बंद करण्याची सरकारवर वेळ येणार नाही.
- विलास खंडेलवाल अध्यक्ष, छत्रपती संभाजीनगर जिल्हा लॉटरी विक्रेता संघटना

Web Title: Maharashtra State Lottery makes 5 people from Chhatrapati Sambhajinagar millionaires; Now 'Shani' is in the lottery horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.