वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 13:33 IST2025-04-20T13:32:27+5:302025-04-20T13:33:39+5:30
चोरांनी गॅस कटर आणले अन् स्फोट झाला; आगीत महाराष्ट्र ग्रामीण बँकेची वैजापूर शाखा जळून खाक झाली.

वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
वैजापूर: येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेला पहाटे लागलेल्या भीषण आगीत बँक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चोरट्यांनी बँक लुटण्याच्या प्रयत्नात गॅस कटरचा वापर केला, मात्र त्यातून स्फोट होऊन आग लागल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या घटनेत चोरटे फरार झाले असून, त्यांनी वापरलेली गाडी पोलिसांच्या ताब्यात आहे. शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे तीनच्या सुमारास काही चोरट्यांनी बँकेचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी गॅस कटरचा वापर केला. मात्र, गॅस कटर हाताळताना अचानक स्फोट झाला आणि त्यातून आगीचा भडका उडाला. काही मिनिटांतच आग संपूर्ण बँकेत पसरली आणि बँकेची इमारत पूर्णपणे जळून खाक झाली. आग इतकी भीषण होती की, बँकेच्या इमारतीतील बहुतांश वस्तू आणि कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
छत्रपती संभाजीनगर: चोरीच्या प्रयत्नात वैजापूरमधील महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा जळून खाक... pic.twitter.com/8xvrkpGbQD
— Lokmat (@lokmat) April 20, 2025
आग लागल्यानंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेचा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चोरट्यांनी पलायनासाठी वापरलेली गाडी घटनास्थळाजवळ सापडली आहे. प्राथमिक तपासात ही गाडी चोरीची असल्याचे समोर आले आहे. पोलिस आता गाडीच्या मालकाचा शोध घेत असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचा आधार घेत आहेत.
बँकेच्या शाखा व्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांनी खातेदारांना दिलासा देताना सांगितले की, "या आगीमुळे खातेदारांच्या पैशांना कोणताही धोका नाही. बँकेतील सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत होतील. खातेदारांनी घाबरून जाऊ नये, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
वैजापूर येथील या घटनेमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. बँक ही परिसरातील अनेक नागरिकांसाठी आर्थिक व्यवहारांचे प्रमुख केंद्र आहे. आगीमुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी विस्कळीत होण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी बँक प्रशासनाकडून लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. गॅस कटरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष असले, तरी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. यामध्ये बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींचाही समावेश आहे. स्थानिक पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांनी सांगितले की, लवकरच चोरट्यांना अटक करण्यात येईल.
या घटनेनंतर बँक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे.