छत्रपती संभाजीनगर : बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये जवान बनवण्याचे आमिष दाखवून चक्क बोगस भरतीचे आयोजन करण्यात आले. पोलिस भरतीप्रमाणे मैदानी चाचणीदेखील घेण्यात आली. मात्र, पात्र उमेदवारांना नियुक्ती शुल्क मागताच टोळीचा भांडाफोड झाला. बुधवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर हा नाट्यमय घोटाळा उघडकीस आला.
विशाल मोहन देवळी (२७), विकास बापू माने (२७) व सनी लाला बागाव (२७, तिघेही रा. ता. पंढरपूर), अशी घोटाळेबाजांची नावे आहेत. वीस दिवसांपासून काही सोशल मीडियावर या भरतीची जाहिरात फिरत होती. त्यात दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर इच्छुकांनी शैक्षणिक कागदपत्रांसह मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याचा उल्लेख होता. सिल्लोड तालुक्यात झेरॉक्सच्या दुकानावर काम करणारा निखिल बागुल (२१) मित्रांसह दि. १७ डिसेंबर रोजी पहाटेच मैदानावर हजर झाला. लष्कराप्रमाणे शिस्त समजून सांगून भरतीची प्रक्रिया सांगण्यात आली. कागदपत्र गोळा करून सर्वांची मैदानी चाचणी घेतली. नंतर ९२ जणांना संपर्क करून दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पुन्हा त्याच मैदानावर अंतिम प्रक्रियेसाठी बोलावण्यात आले होते.
पोलिस भरतीप्रमाणे हुबेहूब मैदानी चाचणीदि. १७ डिसेंबर रोजी पोलिस भरतीप्रमाणे हुबेहूब १२०० मीटर धावणे (२५ गुण), गोळा फेक (२५ गुण) अशी उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली. दि. २५ डिसेंबर रोजी येताना पात्र उमेदवारांनी सहा हजार रुपये नियुक्ती व गणवेश शुल्क लागणार असल्याचे सांगितले. शिवाय ११ महिन्यांचा करार व बारा हजार रुपये मासिक वेतन सांगितले. उमेदवारांना तेव्हाच संशय आला. दि. २५ डिसेंबर रोजी उमेदवारांनी सदर भरती बाबत परवानगीच्या कागदपत्रांची मागणी केली आणि आरोपींचा भांडाफोड झाला. तोपर्यंत अनेकांनी पैसे ट्रान्सफर केले होते. संतप्त उमेदवारांनी तिघांना पकडून सिटीचौक पोलिस ठाण्यात हजर केले. निरीक्षक निर्मला परदेशी यांच्या आदेशावरून निरीक्षक दिलीप चंदन यांनी गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली.
लष्कराचा गणवेश, गाडीवर आर्मीचा उल्लेखआरोपी विशालचा भाऊ लष्करात जवान आहे. सनीने सिव्हिल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. विशाल व विकास मात्र बारावी पास आहे. उमेदवारांचा विश्वास बसावा, ते नेहमी लष्कराच्या गणवेशात असायचे. त्यांच्याकडे असलेल्या गाडीवरदेखील त्यांनी ‘आर्मी’ असे लिहिले आहे. मनोज राऊत नामक व्यक्तीसाठी ही भरती घेत होते, असे त्यांनी सांगितले. मात्र, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची कुठलीही परवानगी त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे मंडळाच्या एकाही व्यक्तीला हा प्रकार खटकला कसा नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.