५ हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला मुहूर्त; महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये रिक्त पदांची माहिती आली
By राम शिनगारे | Updated: March 26, 2026 20:05 IST2026-03-26T20:04:30+5:302026-03-26T20:05:31+5:30
उच्च शिक्षण विभागाचा मोठा निर्णय: १,१७७ अनुदानित महाविद्यालयांत ५ हजार १२ प्राध्यापकांची होणार भरती; जुलै-ऑगस्टपर्यंत प्रक्रिया पूर्ण

५ हजार प्राध्यापकांच्या भरतीला लागला मुहूर्त; महाविद्यालयांच्या लॉगिनमध्ये रिक्त पदांची माहिती आली
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील अनुदानित महाविद्यालयातील ५ हजार १२ प्राध्यापकांच्या भरतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रत्येक अनुदानित महाविद्यालयांमध्ये रिक्त पदांच्या तुलनेत भरण्यात येणाऱ्या जागांचा तपशील मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत विभागीय सहसंचालक कार्यालयांकडून मेलद्वारे महाविद्यालयांना कळविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राज्य शासनाने उच्च शिक्षण विभागाअंतर्गत अनुदानित १ हजार १७७ महाविद्यालयांतील १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारे रिक्त प्राध्यापकांपैकी ५ हजार १२ पदांच्या भरतीसाठी मान्यता देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविषयीचा शासन निर्णय ११ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. तेव्हापासून कोणत्या महाविद्यालयांना किती जागा मिळणार, याविषयीची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. या भरती प्रक्रियेवर विधिमंडळातही चर्चा झाली होती. त्यानुसार महाविद्यालयातील भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांचा तपशील विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी कळविण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. २४ मार्च रोजी राज्यातील सर्वच सहसंचालकांना कार्यालयात थांबण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार संचालक पातळीवरून ऑनलाइन प्रणालीद्वारेच विभागीय स्तरावर कोणत्या महाविद्यालयात किती जागा भरणार याविषयीची माहिती कळविण्यात आली. त्यानुसार राज्यातील १० विभागीय कार्यालयांनी मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत कार्यालयात थांबून संबंधित महाविद्यालयांना रिक्त जागा आणि भरण्याविषयीच्या प्रक्रियेची माहिती ई-मेलद्वारे दिली आहे.
विद्यार्थी संख्या, रिक्त पदानुसार भरती होणार
अनुदानित महाविद्यालयात विषयांना १ ऑक्टोबर २०२५ रोजी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी, महाविद्यालयातील रिक्त पदांनुसार जागांचे वाटप केले आहे. त्यासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअरच विकसित करण्यात आले असून, त्याद्वारेच जागावाटप करण्यात आल्याची माहितीही उच्च शिक्षण विभागाने दिली आहे.
सहा महिन्यांत भरती प्रक्रिया पूर्ण होणार
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यापर्यंतच ५ हजार १२ पदांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी मंत्रीस्तरावरूनच रोस्टर तपासणीसाठी शिबिरांचे आयोजन करणे, पदांना ऑनलाइन मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय सहसंचालक आणि विद्यापीठे कार्य करीत आहे. येत्या शैक्षणिक वर्षात पदभरती झालेले प्राध्यापक शिकवायला असतील हे नक्की.
-डॉ. शैलेंद्र देवळाणकर, संचालक, उच्चशिक्षण विभाग