महापरिनिर्वाण दिन विशेष : बाबासाहेबांनी नागसेनवनात उभारलेल्या सुमेध व अजिंठा वसतिगृहांवर एक दृष्टीक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 01:48 PM2017-12-06T13:48:30+5:302017-12-06T13:57:43+5:30

मराठवाड्यातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये स्थापना केली. या महाविद्यालयाच्या स्थापनेवेळीच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुमेध वसतिगृहाचे बांधकाम केले. यासोबतच मिलिंद महाविद्यालयाची मुख्य इमारती सोबत अजिंठा वसतिगृहाचे बांधकाम बाबासाहेबांच्या देखरेखीतच पूर्ण झालेले आहे.

Mahaparinirvana Day Special: A Look At Babesaheb's Sumedh and Ajantha Residences built in Nagasena | महापरिनिर्वाण दिन विशेष : बाबासाहेबांनी नागसेनवनात उभारलेल्या सुमेध व अजिंठा वसतिगृहांवर एक दृष्टीक्षेप

महापरिनिर्वाण दिन विशेष : बाबासाहेबांनी नागसेनवनात उभारलेल्या सुमेध व अजिंठा वसतिगृहांवर एक दृष्टीक्षेप

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नमुना म्हणजे नागसेनवनात विद्यार्थ्यांसाठी उभारलेले सुमेध वसतिगृह. रदृष्टीचा विचार करीत या बांधकामाची रचना ही ब्रिटिश पार्लमेंटच्या धर्तीवर गोलाकार ठेवण्यात आली. मिलिंद महाविद्यालयाची मुख्य इमारत आणि अजिंठा वसतिगृहाचे बांधकाम बाबासाहेबांच्या देखरेखीतच पूर्ण झाले होते. पूर्वी या वसतिगृहाला ‘मुख्य’ वसतिगृह असे नाव होते. त्यात बदल होऊन कालांतराने ‘अजिंठा’ असे नामकरण झाले.

औरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये स्थापना केली. या महाविद्यालयाच्या स्थापनेवेळीच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुमेध वसतिगृहाचे बांधकाम केले. यासोबतच मिलिंद महाविद्यालयाची मुख्य इमारती सोबत अजिंठा वसतिगृहाचे बांधकाम बाबासाहेबांच्या देखरेखीतच पूर्ण झालेले आहे.

ब्रिटिश पार्लमेंटच्या धर्तीवर उभारलेले सुमेध वसतिगृह

राज्यघटनेचे निर्माते व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीचा आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा नमुना म्हणजे नागसेनवनात विद्यार्थ्यांसाठी उभारलेले सुमेध वसतिगृह. या वसतिगृहाची रचना ही ब्रिटिश पार्लमेंटच्या धर्तीवर केलेले आहे. ही वास्तू डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वत: उभे राहून निर्माण केली. वसतिगृहाचे सर्व बांधकाम त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली पूर्ण केले. मात्र, ही वास्तू सध्या मोडकळीस आलेली आहे. तिचे जतन करणे ही काळाची गरज असून, समाजातील जाणत्या लोकांनी यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. 

मराठवाड्यातील गोरगरीब बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडण्यासाठी बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात मिलिंद महाविद्यालयाची १९५० मध्ये स्थापना केली. या महाविद्यालयाच्या स्थापनेवेळीच विद्यार्थ्यांना राहण्यासाठी सुमेध वसतिगृहाचे बांधकाम केले. दूरदृष्टीचा विचार करीत या बांधकामाची रचना ही ब्रिटिश पार्लमेंटच्या धर्तीवर गोलाकार ठेवण्यात आली. या वसतिगृहात एकूण २३ खोल्या आहेत. या खोल्यांची लांबी, रुंदी खूप मोठी आहे. खोल्यांमध्ये स्वच्छ प्रकाश यावा यासाठी खिडक्या, तावदाने ठिकठिकाणी बसवलेली आहेत.

वस्तू ठेवण्यासाठी कपाटे, खोली थंड राहण्यासाठी भिंतींची उंची जास्त घेत त्यावर कौलारू बसवलेले आहेत. वसतिगृहात डायनिंग हॉल, स्टडी रूम, गरम पाण्याची व्यवस्थाही बाबासाहेबांनी निर्माण केली. गोलाकार आकाराच्या वसतिगृहाच्या समोर सांचीच्या स्तंभाची प्रतिकृती उभारली आहे. अशा या भव्यदिव्य  वसतिगृहाची अवस्था विदारक बनलेली आहे. अनेक खोल्यांचे दरवाजे व खिडक्या निखळल्या आहेत. कौलारू तुटलेत, प्लास्टर निघून गेले आहे. स्वच्छतेच्या अभावामुळे चोहोबाजंूनी घाणीचे साम्राज्य आणि संंबंधित यंत्रणांचे अक्षम्य असे दुर्लक्ष. यामुळे ही ऐतिहासिक वास्तू शेवटच्या घटका मोजत आहे. या वास्तूचे दीर्घकालीन जतन करण्यासाठी डागडुजीची नितांत गरज आहे. ही डागडुजीसुद्धा केंद्रीय पुरातत्व विभागाच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने होण्याची गरज आहे.

एका नरजेतच दिसते वसतिगृह
सुमेध वसतिगृहाची रचनाच अफलातून केलेली आहे. वसतिगृहाच्या कोणत्याही खोलीच्या समोरून नजर फिरवताच सर्व वसतिगृह एका नजरेतच दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या अशा वसतिगृहाचे जतन केलेच पाहिजे, अशी सर्वत्र भावना आहे.

ऐतिहासिक अजिंठा वसतिगृह
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागसेनवनात उभारलेल्या शैैक्षणिक वास्तूमधील ‘अजिंठा’ वसतिगृह हे एक महत्त्वाचे होय. मिलिंद महाविद्यालयाची मुख्य इमारत आणि अजिंठा वसतिगृहाचे बांधकाम बाबासाहेबांच्या देखरेखीतच पूर्ण झाले होते. पूर्वी या वसतिगृहाला ‘मुख्य’ वसतिगृह असे नाव होते. त्यात बदल होऊन कालांतराने ‘अजिंठा’ असे नामकरण झाले.

ब्रिटिश बनावटीचे मिश्रण असलेल्या अजिंठा वसतिगृहाची रचनाही अफलातून आहे. वसतिगृहात एका भव्य दरवाजातून प्रवेश केल्यानंतर दोन्ही बाजूला जवळपास ५४ खोल्या आहेत. सर्व खोल्यांची रचना सारखीच आहे. या वसतिगृहात डायनिंग, बैठक, विरंगुळासाठी स्वतंत्र हॉल निर्माण केलेले आहेत. ब्रिटिशांनी उभारलेल्या इमारतीसारखीच रचना असलेल्या या वसतिगृहातील खोल्या मोठ्या आकाराच्या आहेत. खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे सामान ठेवण्यासाठी कपाट, मोठ्या आकाराच्या खिडक्या, जास्त उंचावर कौलारू असल्यामुळे खोल्यांमध्ये प्रशस्त वाटते. 

मिलिंद महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतिगृह महत्त्वाचे होते. यात राहून शिक्षण घेतलेल्या अनेक पिढ्या आज देशाच्या विकासात मोठे योगदान देत आहेत; मात्र ही वास्तू आज मोडकळीस आलेली असल्याचे पाहायला मिळते, हे दुर्दैव आहे. आज बहुतांश खोल्यांची विदारक स्थिती आहे. अनेक खोल्यांचे दरवाजे, खिडक्या निखळल्या आहेत. कौलारू फुटले आहेत. पावसाळ्यात वसतिगृह सगळीकडून गळते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांना बाहेर जावे लागते. वसतिगृहाच्या चोहोबाजूंनी घाणीचे साम्राज्य आहे. 

वसतिगृहातील विजेची व्यवस्था व्यवस्थित नाही. या एका वसतिगृहावर मिलिंद विज्ञान आणि मिलिंद कला अशा दोन महाविद्यालयांचे नियंत्रण आहे. या वसतिगृहाची डागडुजी करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या वास्तूचे जतन करण्याची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाची आहे. त्यादृष्टीने आतापासूनच प्रयत्न केल्यास महामानवाची निर्मिती पुढील काही पिढ्यांना पुन्ह: पुन्हा प्रेरणा देईल. हे नक्की.

नामांतर व्याख्यानमालेतून सामाजिक प्रबोधन
अजिंठा वसतिगृहात सुरू  केलेली नामांतर व्याख्यानमाला प्रचंड गाजली होती. या व्याख्यानमालेतून विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींनी सामाजिक प्रबोधन केले. या व्याख्यानमालेची लोकप्रियता प्रचंड होती. सायंकाळी ६.३० वाजता व्याख्यानाला सुरुवात होई. बसण्यासाठी श्रोत्यांना जागा मिळत नसे. यातून वैचारिक पिढ्यांची निर्मिती झाली असल्याचे या व्याख्यानमालेचे निर्माते प्राचार्य डॉ.एम. ए. वाहूळ यांनी सांगितले.

मिलिंद रंगमंच बनले लग्नकार्याचे ठिकाण
नागसेनवनात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून सर्वांसाठी एकाच ठिकाणी रंगमंच असावे, अशी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. महाविद्यालय, वसतिगृह, शाळांच्या बांधकामामुळे रंगमंचाचा विषय लांबणीवर पडला होता; मात्र बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ही इच्छा अवघ्या पावणेदोन वर्षांतच मूर्त स्वरूपात अस्तिवात आली. मिलिंद रंगमंचच्या कोनशिलेचे अनावरण राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते २३ आॅगस्ट १९५८ रोजी झाले. याच दिवशी तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाची पायाभरणी राष्ट्रपतींनी केली होती. यानंतर काही दिवसांत हे रंगमंच सर्वांसाठी खुले झाले. पुढे याच रंगमंचासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मराठवाड्यातील पहिला अर्धपुतळा १४ एप्रिल १९६३ रोजी बसविण्यात आला.

या रंगमंचाची रचनाही भव्यदिव्य आहे. मोठे सभागृह, बाल्कनी, कलाकारांना कपडे बदलण्यासाठी रंगमंचच्या डाव्या आणि उजव्या बाजूने खोल्या बांधलेल्या आहेत. हवा खेळती राहण्यासाठी सभागृहाच्या भिंती उंच घेतलेल्या आहेत. सध्या या रंगमंचावर कलाकारांच्या कलाविष्कारापेक्षा लग्नकार्यच अधिक प्रमाणात होतात. याशिवाय त्याठिकाणी कार्यक्रमांचे प्रमाण कमी असल्यामुळे सर्वत्र धूळ, घाणीचे साम्राज्य आहे. अनेक दरवाज्यांच्या काचा, खिडक्या तुटल्या आहेत. दरवाजे तुटलेले आहेत. स्वच्छतागृहामध्ये प्रचंड घाण असल्याचे दिसून आले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मराठवाड्यातील पहिल्या अर्धपुतळ्यासमोर स्वच्छता केलेली होती; मात्र मागील भाग विपन्नावस्थेत आहे. याची देखभाल, दुरुस्ती करण्याची नितांत गरज आहे.

Web Title: Mahaparinirvana Day Special: A Look At Babesaheb's Sumedh and Ajantha Residences built in Nagasena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.