महाकवी वामनदादा कर्डक यांना एमजीएम विद्यापीठाची मरणोत्तर डीलीट
By राम शिनगारे | Updated: October 10, 2023 14:26 IST2023-10-10T14:22:10+5:302023-10-10T14:26:15+5:30
एमजीएम विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यास नितीन गडकरी येणार; ८६७ विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात येईल

महाकवी वामनदादा कर्डक यांना एमजीएम विद्यापीठाची मरणोत्तर डीलीट
छत्रपती संभाजीनगर : महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा शुक्रवारी (दि.१३) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. या सोहळ्याला केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोहळ्यात ८६७ विद्यार्थ्यांना पदवी आणि महाकवी वामनदादा कर्डक यांना मरणोत्तर डी.लीट पदवीने सन्मानित केले जाणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
एमजीएम विद्यापीठाच्या दुसऱ्या दीक्षांत सोहळ्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. सपकाळ यांच्यासह कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, परीक्षा नियंत्रक डॉ.हरिरंग शिंदे, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके, प्रा. परविंदर कौर यांची उपस्थिती हाेती. यावेळी कुलगुरू डॉ.सपकाळ म्हणाले, २०१९ साली स्थापन झालेल्या विद्यापीठाला यूजीसीने २ (एफ) दर्जा दिला आहे. विद्यापीठात विविध विद्याशाखांमधील अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. या दीक्षांत सोहळ्यात ७ विद्याशाखांमधील पदवीच्या ३५३, पदव्युक्तर ४४३, पदविका ४२, पदव्युत्तर पदविका २०, प्रमाणपत्र अभ्यसक्रमाच्या ९ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार आहे. त्यात पदवीच्या ४, पदव्युत्तरचे ६ अशा एकुण १० विद्यार्थ्यांना कुलपती सुवर्ण पदकाने सन्मानित केले असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह कुलपती अंकुशराव कदम यांची विशेष उपस्थित असणार आहे. विद्यापीठाचा दुसरा दीक्षांत सोहळा विशेष असा असल्याची माहिती कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी दिली.
आण्णाभाऊ साठे यांच्यानंतर वामनदादा
एमजीएम विद्यापीठाने पहिल्या दीक्षांत सोहळ्यात महान साहित्यीक अण्णाभाऊ साठे यांना मरणाेत्तर डी.लीट पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यानंतर दुसऱ्या दीक्षांत सोहळ्यात महाकवी वामनदादा कर्डक यांना डी.लीट पदवीने सन्मानित केले जाणार आहे. परिवर्तनवादी चळवळीतील शिलेदारांची निवड डी.लीटसाठी एमजीएमकडून केली आहे.