मॅग्मो संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन
By Admin | Updated: July 2, 2014 00:28 IST2014-07-02T00:24:38+5:302014-07-02T00:28:42+5:30
उस्मानाबाद : विविध संघटनांनी एकत्रितरीत्या आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयापर्यंतची आरोग्य यंत्रणा ढेपाळली असून, रूग्णांसह नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत़

मॅग्मो संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन
उस्मानाबाद : महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटना,शासकीय औषधनिर्माता गट क कर्मचारी संघटना आणि आरोग्य विभागाच्या महाराष्ट्र राज्य वाहन चालक संघटनेने डॉक्टर्स डे पासूनच असहकार कामबंद आंदोलन सुरू केले आहे़ विविध संघटनांनी एकत्रितरीत्या आंदोलनाचे हत्यार उपसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र ते जिल्हा रूग्णालयापर्यंतची आरोग्य यंत्रणा ढेपाळली असून, रूग्णांसह नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत़
जून महिन्यात मॅग्मो संघटनेच्या वतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केलेले आंदोलन राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनामुळे मागे घेण्यात आले होते़ मात्र, या आश्वासनांची पूर्तता शासनाकडून होत नसल्याने पुन्हा आंदोलन सुरू करण्यात आले आहे़ जिल्हा रूग्णालयात मंगळवारपासून निदर्शने, धरणे आंदोलन करण्यास प्रारंभ झाला आहे़ या आंदोलनात बाह्य रूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग, अत्यावश्यक सेवा, एमएलसी, शवविच्छेदन, साथरोग, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे़ आंदोलनात प्रा़आरोग्य केंद्र, तालुका वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा रूग्णालयासह इतर आरोग्य विभागातील मॅग्मोशी संलग्नित असलेले अधिकारी सहभागी झाले आहेत़ आंदोलनात सहभागी १५० जणांनी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे आपले सामूहिक राजीनामे दिले़ यावेळी संघटनेचे विभागीय सचिव डॉ़ सचिन देशमुख, जिल्हाध्यक्ष डॉ़महेश कानडे, डॉ़अभिजीत बागल, डॉ़ संजय सोनटक्के, डॉ़विवेक होळे, डॉ़सुजित रणदिवे, डॉ़आळंगेकर, डॉ़ सचिन रामढवे, डॉ़ललिता स्वामी, डॉ़ ज्योती कल्याणी डॉ़टिके आदी सहभागी झाले होते़ तर औषध निर्माता संघटनेचे प्रकाश मक्तेदार, नंदकुमार वाघमारे, संजय राऊत, मंत्री, सुभाष पाटील, वेदपाठक, पोहनेरकर, पवार आदी सहभागी झाले होते.
डॉक्टरांच्या मागण्या
सन २००९-१० मध्ये सवो समावेश झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पूर्वलक्ष लाभ मिळावा
अस्थायी जवळपास ७८९ एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी गट ब व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ब यांचे सेवा समावेशन करावे
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ करावे
डॉक्टरांच्या पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा
वरिष्ठ अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणे तीन व सहा आगावू वेतनवाढीचा लाभ द्यावा
वैद्यकीय अधिकाऱ्यांना व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना उच्च वेतन लागू करावे आदी़
औषधनिर्मात्यांच्या मागण्या
सहाव्या वेतन आयोगात औषध निर्माण अधिकारी संवर्गास केंद्रशासनाच्या संदर्भित शासन निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने प्रारंभिक वेतनश्रेणी लागू करण्यात यावी.
पदोन्नतीच्या सेवा उपलब्ध करून द्या
फार्मसी अॅक्टचे उल्लंघन रोखण्यासाठी पूर्ववत दोन पदे कायम करावीत
ब्रिज कोर्स लागू करावा
मासिक २० हजार वेतन द्याव.
ग्रामीण जनताही हैराण
मॅग्मो संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या असहकार काम बंद आंदोलनात प्राथमिक रूग्णालय, ग्रामीण रूग्णालयासह उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले होते़ त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दाखल रूग्णांसह उपचारासाठी दिवसभर येणाऱ्या रूग्णांसह नातेवाईकांचे मोठे हाल झाले़ अनेकांना खासगी रूग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत होते़