आघाडीचे नशीबच ‘लयं भारी’
By Admin | Updated: September 22, 2014 00:55 IST2014-09-22T00:33:29+5:302014-09-22T00:55:34+5:30
बीड : २९- २९ अशा समसमान संख्याबळाने रोमांचक वळणावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच युतीला

आघाडीचे नशीबच ‘लयं भारी’
बीड : २९- २९ अशा समसमान संख्याबळाने रोमांचक वळणावर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच युतीला ‘लयं भारी’ ठरली़ चिठ्ठ्या टाकून निवडी जाहीर करण्यात आल्या. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या आशा संजय दौंड यांची वर्णी लागली. विधानसभेच्या आधी मिनी मंत्रालयावर झेंडा फडकवून आघाडीने युतीला जोराचा हादरा दिला आहे़
जि. प. मध्ये एकूण ५९ सदस्य असून अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादीच्या सदस्या सविता मदन आहेर यांचे जातप्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यत्व धोक्यात आले होते. त्याचबरोबर आ. विनायक मेटे, माजी आ. भीमराव धोंडे, साहेबराव दरेकर यांचे प्रत्येकी एक सदस्य राष्ट्रवादीतून भाजपात दाखल झाले. पाठोपाठ रमेश आडसकर यांनीही तीन सदस्यांसह भाजपाचा तंबू गाठला. त्यामुळे युतीला सत्तांतराची आयती संधी चालून आली होती;परंतु आघाडीच्या दोन्ही उमेदवारांना चिठ्ठीने तारले. त्यामुळे सत्तासूत्रे पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडेच गेली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषदेतील सत्ता राखता आल्याने आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
अशी झाली प्रक्रिया..!
रविवारी दुपारी एक वाजेपासून जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात अध्यक्ष- उपाध्यक्षांच्या निवडीच्या प्रकियेला सुरुवात झाली. एक ते दोन या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात आले. दोन वाजता आघाडी व युतीचे सदस्य गटागटाने जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेला प्रारंभ झाला. अडीच वाजेपर्यंत छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली. आघाडीकडून अध्यक्षपदासाठी स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडीकडून गेवराई तालुक्यातील मादळमोही गटातून निवडून आलेले विजयसिंह शिवाजीराव पंडित व केज तालुक्यातील युसूफवडगाव गटातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आलेले बजरंग मनोहरराव सोनवणे यांचे अर्ज आले. मात्र, बजरंग सोनवणे यांनी माघार घेतली. त्यामुळे अध्यक्षपदासाठी आघाडीकडून विजयसिंह पंडित यांचा अर्ज राहिला.
उपाध्यक्षपदासाठी आशा संजय दौंड यांना संधी देण्यात आली. अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव गटातून काँग्रेसकडून निवडून आलेल्या आशा दौंड यांचा आघाडीकडून एकमेव अर्ज होता.
इकडे युतीने अध्यक्षपदासाठी सर्वसामान्य सदस्य दिला. अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गटाचे भाजपाचे सदस्य दत्ता जयवंतराव जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपासाठी मानूर गटातील सदस्य दशरथ तुळशीराम वनवे यांचा अर्ज भरण्यात आला.
दुपारी तीन वाजता हात उंचावून मतदानाची प्रकिया पार पडली. अध्यक्षपदासाठी आघाडीचे उमेदवार विजयसिंह पंडित व युतीचे दत्ता जाधव यांच्यात चुरस होती. त्या दोघांनाही प्रत्येकी २९ मतदान झाले. त्यामुळे चिठ्ठया टाकून निवड करावी लागली. यात विजयसिंह पंडित यांना लॉटरी लागली.
उपाध्यपदासाठी आघाडीच्या उमेदवार आशा दौंड व युतीचे उमेदवार दशरथ वनवे यांचे अर्ज होते. त्या दोघांनाही २९-२९ अशी समान मते मिळाली. त्यामुळे त्यांच्या नावाच्याही चिठ्ठ्या टाकाव्या लागल्या. यामध्ये आशा दौंड नशीबवान ठरल्या.
चार वाजता जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जि.प. च्या प्रवेशद्वारावर विजयसिंह पडित यांची अध्यक्षपदी तर आशा दौंड यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागल्याचे अधिकृतपणे जाहीर केले. निवड पारदर्शक असून त्यात कोणी आक्षेप घेण्याचे कारण नाही, अशी स्पष्टोक्तीही जिल्हाधिकारी राम यांनी केली.
साडेतीन वाजल्यापासूनच
पंडित समर्थकांचे ‘सेलिब्रेशन’!
जिल्हापरिषद सभागृहात निवड प्रक्रिया सुरु होती. दुपारी साडेतीन वाजता अध्यक्षपदासाठी विजयसिंह पंडित यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. हा ‘मेसेज’ कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचताच तोफा वाजण्यास सुरुवात झाली. पंडित समर्थक महामार्गावर गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा करु लागले.
यावेळी महामार्ग ठप्प झाला. पंडित समर्थकांचे सेलिब्रेशन अर्धा तास सुरुच होते. चार वाजता संदीप क्षीरसागर जि.प. च्या प्रवेशद्वारा आले. त्यांनी दोन्ही हात उंचावून इशारा करताच कार्यकर्ते दुप्पट जोशाने नाचू लागले. त्यानंतर विजयसिंह पंडित यांना डोक्यावर घेऊन कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी गुलालाने पंडित हे पूर्णपणे माखून गेले होते. त्यानंतर पंडित यांच्या निवासस्थानीही कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली.
नशीब आमच्याच बाजूने
जि.प. अध्यक्षपदी निवड झाल्यावर विजयसिंह पंडित यांनी पत्रकारांना सांगितले की, दोन्हीकडे समान बलाबल होते. त्यामुळे काय होईल, काय नाही हे सांगता येणे कठीण होते;परंतु अध्यक्षपदासाठी माझ्या नावाची तर उपाध्यक्षपदासाठी आशा दौंड यांच्या नावाची चिठ्ठी निघाली. नशीब आमच्याच बाजूने आहे. या निकालाचा परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चिपणे होईल. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससाठी ही आनंदाची बाब आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर, राज्यमंत्री सुरेश धस, राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्व आमदार यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्याला तडा जाऊ देणार नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामान्यांना न्याय देण्यासाठी कटीबद्ध राहू, अशी प्रतिक्रिया पंडित यांनी दिली.
हे तर आघाडीचे यश!
नवनियुक्त उपाध्यक्षा आशा संजय दौंड यांनी सांगितले की, काँग्रेसची मी एकमेव सदस्या आहे. असे असतानाही माझ्यावर विश्वास टाकला. राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या एकजुटीमुळेच हे यश साकार करता आले. या पदाचा वापर गोरगरिबांची सेवा करण्यासाठी करु. ‘काँगे्रस का हाथ आम आदमी के साथ’ या वचनानुसार सामान्यांचे हित जपण्याचाच माझा प्रयत्न राहील. शासनाच्या विविध विकास योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी माझी भूमिका आग्रहाची राहणार आहे, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.