लखनऊच्या ‘डुमनी’ची आकाशात भरारी; संक्रांतीच्या महिनाभरआधीच पतंगबाजी सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 18:53 IST2024-12-14T18:52:38+5:302024-12-14T18:53:08+5:30
पौना, ढाच्चा, आध्धा या छत्रपती संभाजीनगरात बनलेल्या पतंगासोबत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथल ‘डुमनी’ पतंगालाही जास्त मागणी आहे.

लखनऊच्या ‘डुमनी’ची आकाशात भरारी; संक्रांतीच्या महिनाभरआधीच पतंगबाजी सुरु
छत्रपती संभाजीनगर : ऐतिहासिक शहरात पतंग तयार करणारे कारागीर आहेत. येथील पतंगाला निजामाबादपर्यंत मागणी असते. मात्र, यंदा उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून आलेल्या ‘डुमनी’ची त्यांना जबरदस्त स्पर्धा करावी लागत आहे. कारण, सध्या शहराच्या आकाशात ‘डुमनी’ पतंग भरारी घेत आहेत.
पौना, आध्धा सोबत डुमनी
मकरसंक्रांतीच्या दिवशी सर्वत्र पतंगोत्सव साजरा केला जातो. सध्या पतंग विक्री जोरात सुरू झाली आहे. यात पौना, ढाच्चा, आध्धा या छत्रपती संभाजीनगरात बनलेल्या पतंगासोबत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथल ‘डुमनी’ पतंगालाही जास्त मागणी आहे. १०० पतंग विक्रीमध्ये ४० पतंग ‘डुमनी’ विकल्या जात आहेत.
हवेच्या कमी दाबात उडणाऱ्या पतंगांना मागणी
शहरात हवेचा दबाव कमी असतो. यामुळे येथे पातळ कामटी लावलेले पतंग जास्त विक्री होतात. त्यात पतंगाच्या चारीबाजूने कडेला दोर भरलेली असतो. हीच छत्रपती संभाजीनगरमधील कारागिरांनी बनविलेल्या पतंगाची खासियत आहे. मात्र, हे कौशल्य आता लखनऊ, कानपूर, जयपूर येथील कारागिरांनीही प्राप्त केले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर विरुद्ध लखनऊ अशी स्पर्धा वाढली आहे, अशी माहिती पतंगाचे व्यापारी सय्यद अमिनोद्दीन यांनी दिली.
५ ते ५० रुपयांपर्यंत पतंग
शहरात आजघडीला डुग्गा पतंग ५ रुपयांना मिळत आहे. ५० रुपयांत डाच्चा पतंग विक्री होत आहे. आध्धा १२ रुपये, पाैना १५ ते १८ रुपये, तर डुगनी ५ ते २५ रुपयांना विक्री होत आहे.