लखनऊचे मोबाईल चोरटे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 18:55 IST2018-03-26T18:54:48+5:302018-03-26T18:55:36+5:30

चादर आणि बेडशीट विक्री करण्याच्या नावाखाली शहरात आलेल्या लखनऊच्या (राज्य उत्तरप्रदेश) दोन चोरट्यांना नवा मोंढ्यातील भाजीमार्केटमध्ये ग्राहकांचे मोबाईल चोरताना सिडको पोलिसांनी रंगेहात पकडले.

Lucknow mobile thieves trapped by Aurangabad police | लखनऊचे मोबाईल चोरटे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात

लखनऊचे मोबाईल चोरटे औरंगाबाद पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद : चादर आणि बेडशीट विक्री करण्याच्या नावाखाली शहरात आलेल्या लखनऊच्या (राज्य उत्तरप्रदेश) दोन चोरट्यांना नवा मोंढ्यातील भाजीमार्केटमध्ये ग्राहकांचे मोबाईल चोरताना सिडको पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून चोरीचे चार मोबाईल जप्त केले असून त्यांचा एक साथीदार आणखी चार मोबाईलसह पसार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहे.

सर्वजीत अर्जून महातोर(२०), धर्मवीरकुमार निवारण ठाकुर(२२, दोघे रा. कासंबरी, जि. लखनऊ, उत्तरप्रदेश)अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, २५ मार्च रोजी सकाळी साडेनऊ ते अकरा वाजेदरम्यान नवा मोंढा जाधववाडी येथील भाजीमंडीत खरेदीसाठी आलेल्या आठ ग्राहकांचे मोबाईल चोरीला गेल्याच्या तक्रारी सिडको पोलिसांकडे आल्या. यापैकी हमचंद्र दपाडु चिरमाडे(३५,रा. म्हसोबानगर, हर्सूल परिसर) यांनी लेखी तक्रार सिडको ठाण्यात नोंदविली.

याबाबतची माहिती मिळताच सिडको ठाण्यातील  पोहेकाँ राजेश बनकर, प्रकाश डोंगरे, संतोष मुदीराज, इरफान खान, सुरेश भिसे, योगेश म्हस्के आणि राजू जाधव यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळ आणि परिसर पिंजून काढला. तेव्हा दोन तरुण संशयितरित्या जात असल्याचे पोलिसांना दिसले. पोलिसांनी संशयितांची चौकशी केली असता ते उडवा ,उडवीची उत्तरे देऊ लागले. दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळे चार मोबाईल हॅण्डसेट मिळाले. या मोबाईलच्या बिलासंदर्भात आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांना काहीही सांगता आले नाही. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली देत नवा मोंढा येथे गर्दीत ग्राहकांच्या खिशातून मोबाईल चोरील्याची कबुली दिली. त्यांच्यासोबत आणखी एक साथीदार असून त्याच्या मदतीने या चोर्‍या केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे , पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचार्‍यांनी ही कामगिरी केली.

Web Title: Lucknow mobile thieves trapped by Aurangabad police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.