५४ केंद्रांवर करडी नजर
By Admin | Updated: April 20, 2015 00:32 IST2015-04-20T00:24:24+5:302015-04-20T00:32:39+5:30
पंकज जैस्वाल , लातूर लातूर जिल्ह्यात ३४६ गावांमध्ये २२ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत़ या निवडणुकीत जिल्ह्यातील ११४२ मतदान केंद्रांपैकी

५४ केंद्रांवर करडी नजर
पंकज जैस्वाल , लातूर
लातूर जिल्ह्यात ३४६ गावांमध्ये २२ एप्रिल रोजी ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत़ या निवडणुकीत जिल्ह्यातील ११४२ मतदान केंद्रांपैकी ५४ केंद्रांवर मात्र निवडणूक आयोगाची करडी नजर आहे़ या दक्ष केंद्रांवर व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे लक्ष ठेवले जात असून, सुक्ष्म निरीक्षकांद्वारे निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविला जात आहे़
लातूर जिल्ह्यातील ३९५ पैकी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्याने ३४६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत़ यासोबतच ४४ ठिकाणी पोटनिवडणुकाही होत आहेत़ निवडणुकीच्या रणधुमाळीत ८ हजार २०२ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत़ काही गावात दुरंगी लढत, काही गावात तिरंगी लढत तर काही गावात चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ प्रचारासाठी दोन दिवसाचा कालावधी शिल्लक राहिल्याने ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी घरोघरी भेटीवर भर दिला असल्याचे चित्र दिसून येत आहे़
गाव पातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन निवडणुकीचा प्रचार केला जात आहे़ त्यामुळे डिजीटल बॅनर, पोस्टर वॉर जोरात सुरु झाले आहेत़ निवडणुकीमुळे गटबाजीला उधान आल्यामुळे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत़ महत्वाची खलबते करण्यामध्ये गावातील नेते-कार्यकर्ते यांच्या छुप्या बैठका सुरु आहेत़ प्रचारासाठी मोबाईल संदेश, सोशल मिडियाचा वापरही वाढलेला आहे़ एकंदरीत ग्रामपंचायतीची यावेळेची निवडणूक आधुनिक तंत्रज्ञानामुळे चुरशीची बनली आहे़
या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यात १५५० इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन उपलब्ध आहेत, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ़ अनंत गव्हाणे यांनी दिली़ मतदानानंतर या इव्हीएम मशीनमधील डाटा ट्रेझरीमध्ये सुरक्षीत ठेवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले़ मतयंत्र वाहतूकीसाठी १०० बसेस व १४५ जीप लागणार आहेत़ निवडणूक कामासाठी ६ हजार कर्मचारी तैनात आहेत़ या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षणही देण्यात आले आहे़ रविवारी प्रशिक्षणाचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे़ मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कालावधीत करावयाची कामे सांगितली़
लातूर तालुक्यात बाभळगाव, सिकंदरपूर, बोरी, खोपेगाव येथील जि़प़ केंद्रीय प्रशालेतील चार केंद्र दक्ष केंद्र ठरविण्यात आले असून, उर्वरीत ५० केंद्रांची नावे त्या-त्या तालुक्यातील केंद्र प्रमुखांकडे पाठविली आहेत़ या केंद्रांवर व्हिडीओ कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवली जात आहे़ अतिरिक्त पोलिस व मनुष्यबळही तैनात करण्यात येत आहे़ ग्रामपंचायत निवडणुकीतील या ५४ केंद्रांना दक्ष केंद्र म्हणून अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येत आहे़ या केंद्रावर प्रशासकीय यंत्रणेने दक्ष रहावेत, अशा सुचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत़
४लोकसभा - विधानसभा निवडणुकीत संवेदनशील मतदान केंद्र जाहीर होतात़ परंतु ग्रामपंचायत निवडणुकीत दक्ष केंद्र असतात़ तेथे अतिरिक्त पोलिस कर्मचारी, अतिरिक्त मनुष्यबळ, व्हिडीओ कॅमेरे तैनात असतात़ सुक्ष्म निरीक्षक या केंद्रांचा अहवाल आयोगाकडे पाठविणार आहेत़
४दक्ष केंद्रांबाबत पोलिसांकडून अहवाल मागविण्यात आला होता़ गेल्या काही निवडणुकांमध्ये झालेल्या घटनांचा मागोवा पोलिसांनी घेतला आहे़ त्या अनुषंगाने दिलेल्या अहवालावरुन दक्ष केंद्र ठरविण्यात आले़