‘लोकमत’ने केला शेतकऱ्यांचा गौरव...
By Admin | Updated: January 21, 2015 01:09 IST2015-01-21T01:00:11+5:302015-01-21T01:09:39+5:30
लातूर : १९७२ च्या भीषण दुष्काळावर मात करून जीवन जगलेल्या आणि कुटुंबाला जगविलेल्या बहाद्दर शेतकऱ्यांचा ‘लोकमत’ने वर्धापन दिनाच्या सोहळ्यात गौरव केला.

‘लोकमत’ने केला शेतकऱ्यांचा गौरव...
लातूर : १९७२ च्या भीषण दुष्काळावर मात करून जीवन जगलेल्या आणि कुटुंबाला जगविलेल्या बहाद्दर शेतकऱ्यांचा ‘लोकमत’ने वर्धापन दिनाच्या सोहळ्यात गौरव केला. ‘रडायचं नाही, लढायचं’ या सदराखाली यापूर्वीच त्यांच्या यशोगाथा वाचकांसमोर मांडल्या होत्या. सोमवारी प्रत्यक्ष त्यांना स्नेहमिलन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘रडायचं नाही, लढायचं’ या सदराखाली ‘लोकमत’ने या शेतकऱ्यांची यशोगाथा वाचकांसमोर मांडली होती. वर्धापनदिनाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने या यशस्वी शेतकऱ्यांना वाचकांसमोर आणले. ‘लोकमत भवन’ एमआयडीसी कार्यालयासमोर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
औसा तालुक्यातील नागरसोगा येथील विजयकुमार मिश्रा, बाबूराव शिंदे, किल्लारी येथील भगवान बिरादार, कोरंगळा येथील रंगनाथ जंगाले, जळकोट तालुक्यातील कोळनूर येथील लक्ष्मण चोले, निलंगा तालुक्यातील तगरखेडा येथील दादाराव थेटे, हलगरा येथील दिगंबर गायकवाड, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हलकी येथील सुनीता शेंडगे, रेणापूर तालुक्यातील कोळगाव येथील श्रीराम कोपनर, शेरखाँ पठाण, जवळगा येथील सतीश बिराजदार, अहमदपूर येथील सुलोचना हामणे, केशव गलाले, तिपराळ येथील विश्वनाथ बिरादार आदींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आम्ही जगलेल्या कहाणीवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून आमचा गौरव केला, अशी कृतज्ञताही सत्कारमूर्र्तींनी व्यक्त केली. १९७२ चा दुष्काळ भीषण होता.
या दुष्काळातील अनुभव कथन आणि जगण्यासाठी केलेली धडपड ‘रडायचं नाही, लढायचं’ या सदराखाली मांडली होती. ‘लोकमत’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या सर्व शेतकऱ्यांना वर्धापन दिनाच्या सोहळ्यात निमंत्रित करून त्यांच्या जगण्याचा एक आदर्श शेतकऱ्यांपुढे ठेवला. याचे भरभरून कौतुक पाहुण्यांनी केले. ४
१९७२ चा दुष्काळ आणि आताचा दुष्काळ भीषण आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करून जगलेच पाहिजे. ‘लोकमत’ने ही शक्ती शेतकऱ्यांमध्ये निर्माण केली आहे. भविष्यात पाणीप्रश्न भेडसावणार आहे. त्यामुळे या पुढील काळात पाण्याच्या बचतीचे प्रबोधन ‘लोकमत’ने करावे, असे मत माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे व्यक्त केले.
४पर्जन्यमान कमी होत असल्याने पाण्याची पातळी झपाट्याने घसरत आहे. त्यामुळे जलसिंचनाची मोहीम राबविण्याची गरज आहे. पाण्याचा संचय गावात आणि शिवारात झाला पाहिजे. पावसाचा थेंबन् थेंब जमिनीत मुरविला तरच पाण्याची समस्या आपण सोडवू शकू. अन्यथा गंभीर प्रश्नाला सामोरे जावे लागणार आहे.
४‘लोकमत’ने सामाजिक बांधिलकीतून शेतकऱ्यांना ऊर्जा दिली. यंदाचा दुष्काळ पाहता गत दुष्काळातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा नव्या शेतकऱ्यांसमोर मांडून त्यांना जगण्याची नवी दिशा दिली. ही सामाजिक बांधिलकी आहे. एवढ्यावरच ‘लोकमत’ थांबले नाही, तर कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतही केली. ‘लोकमत’चा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे पाशा पटेल म्हणाले.
शेतकऱ्यांचा गौरव आणि आर्थिक मदतीचा उपक्रम पाहून जिल्हा प्रशासनाने ‘लोकमत’चे कौतुक केले. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, आरोग्य उपसंचालक डॉ. सूर्यकांत निसाले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बसवराज कोरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विश्वंभर गावंडे, उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, डॉ. सुनीलकुमार यादव आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गौरवाचे कौतुक केले.
४प्रशासनाकडून ‘बळीराजा सबलीकरण योजना’ राबविण्यात येते. परंतु, ते शासकीय काम आहे. शासकीय योजना म्हणून त्या शेतकऱ्यांच्या पदरात देण्याचा प्रयत्न असतो. परंतु, ‘लोकमत’ने राबविलेला हा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून आलेला आहे. हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी शुभेच्छा देताना सांगितले.