Lok Sabha Election 2019 : ही भांडणाची वेळ नाही; औताडे-काळे दिलजमाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 20:07 IST2019-03-28T20:06:50+5:302019-03-28T20:07:10+5:30
सहकार क्षेत्रातील काही निवडणुकांच्या निमित्ताने काळे व औताडे हे आमनेसामने आले होते.

Lok Sabha Election 2019 : ही भांडणाची वेळ नाही; औताडे-काळे दिलजमाई!
औरंगाबाद : काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विलासबापू औताडे व फुलंब्रीचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात दिलजमाई झाली असून ‘मी औताडे यांना फुलंब्री मतदारसंघातून लीड मिळवून देणार’ असा निर्धार आज गांधी भवनात झालेल्या प्रचाराच्या नियोजनाच्या बैठकीत डॉ. काळे यांनी टाळ्यांच्या कडकडाटात केला.
औरंगाबाद तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रामूकाका शेळके यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. जालना लोकसभा मतदारसंघात औरंगाबाद, फुलंब्री व सिल्लोड तालुक्यांचा समावेश आहे. औरंगाबाद तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठकीला मोठी उपस्थिती होती. बैठकीच्या निमित्ताने विलासबापू, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष केशवराव औताडे, डॉ. कल्याण काळे व तालुक्यातील जुने-नवे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्र आले होते.
नाना- दादा यांच्यात प्रचंड वितुष्ट आहे. ते कार्यक्रमात एकत्र बसणे सुद्धा टाळतात. याची चर्चा होत नाही, पण औताडे- काळे यांच्यातील मतभेदांची चर्चा मात्र चवीने करीत राहणार, हे थांबले पाहिजे व जालना मतदारसंघातील चकवेगिरी आता मोडीत काढली पाहिजे, असे आवाहन काळे यांनी केले. विलासबापू औताडे यांनी केंद्रातील भाजप सरकारचे अपयश मोजीत सडकून टीका केली. केशवराव औताडे यांनी विलासबापूंना विजयी करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी झटावे, असे आवाहन केले.
काकासाहेब कोळगे पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, प्रकाश मुगदिया, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, अशोक डोळस, देवीचंद अग्रवाल, अनिल मानकापे, अंकुश चौधरी, संतोष शेजूळ, विठ्ठल कोरडे, दत्ता तारू आदींची भाषणे झाली.
सत्ता आली तर भांडता येते...
सहकार क्षेत्रातील काही निवडणुकांच्या निमित्ताने काळे व औताडे हे आमनेसामने आले होते. नंतर जि.प. व पं.स. निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. खालच्या या छोट्या- मोठ्या निवडणुकांमध्ये गट-तट, पॅनल हे चालूच राहतात; पण ही लोकसभेची निवडणूक आहे. ही भांडणाची वेळ नाही. माझं गाव... माझा बुथ सांभाळून पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची गरज आहे. सत्ता आली तर भांडता येते. आता सत्ताच नाही तर काय भांडायचं? असा सवाल काळे यांनी उपस्थित केला.