Lok Sabha Election 2019 : औरंगाबादमध्ये भाजप स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नाही; शिवसेनेने सांगितल्यासच प्रचारात उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 19:16 IST2019-03-23T19:12:13+5:302019-03-23T19:16:15+5:30
पंतप्रधान मोदींसाठी खैरांना सहकार्य करण्याची भूमिका

Lok Sabha Election 2019 : औरंगाबादमध्ये भाजप स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नाही; शिवसेनेने सांगितल्यासच प्रचारात उतरणार
औरंगाबाद : शिवसेनेकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष एकनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शिवसेनेने प्रचार कोठे कारायचा? कसा करायचा? याचे नियोजन केल्यास त्यात सहभागी होणार आहोत. भाजप स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
भाजपा-शिवसेना युतीतर्फे खा. खैरे यांच्या उमेदवारीची घोषणा शुक्रवारी मुंबईत करण्यात आली. मात्र मागील पाच वर्षांपासून भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली कटुता संपावी यासाठी युतीचा औरंगाबादेत संयुक्त मेळावा घेण्यात आला. हा मेळावा घेऊनही दोन्ही पक्षांतील कटुता संपुष्टात आलेली नसल्याचा प्रत्यय खा. खैरे यांची उमेदवारी जाहीर होताच आला. जाधव म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी भाजप खा. खैरे यांना मदत करणार आहे; मात्र स्वत:हून कोणतीही प्रचार यंत्रणा राबविणार नाही. शिवसेना सांगेल त्याठिकाणी भाजपचे पदाधिकारी प्रचारात सहभागी होतील. भाजपने स्वत:हून प्रचार केल्यास त्याचाही गैरअर्थ काढला जाऊ शकतो. त्यामुळे स्वत:हून काहीही न करता शिवसेना पदाधिकारी सांगतील त्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले.
३० मार्च रोजी खा. खैरे दाखल करणार नामांकन
दरम्यान, औरंगाबादचे विद्यमान खा. चंद्रकांत खैरे यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. येत्या ३० मार्च रोजी खा. खैरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. यासाठी विविध पंचांगकर्त्यांकडून वेळ पाहून घेतला असल्याचेही समजते.