लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद, गृहकर्ज कसे फेडावे? या चिंतेने तरुणाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 13:05 IST2021-05-18T13:03:29+5:302021-05-18T13:05:02+5:30
गृहकर्ज वेळेत न भरल्यास बँक आपल्या घराचा लिलाव करू शकते अशी भीती त्यांना सतावत होती.

लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद, गृहकर्ज कसे फेडावे? या चिंतेने तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे कामधंदा बंद झाल्याने गतवर्षीपासून गृहकर्जाचे हप्ते थकले. यावर्षीही महिनाभरापासून पुन्हा लॉकडाऊन सुरू आहे. आता गृहकर्ज कसे फेडायचे, या चिंतेने ग्रासलेल्या एका कर्जदार तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना हर्सूल परिसरातील किर्तीनगरात सोमवारी सकाळी समोर आली.
राजेंद्र बंडू वाघ (वय ३१) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, वाघ हे शहरातील इलेक्ट्रॉनिक दुकानात सेल्समन होते. फायनान्स कंपनीकडून गतवर्षी कर्ज घेऊन त्यांनी किर्तीनगर येथे घर बांधले. सुरुवातीचे दोन हप्ते त्यांनी भरले आणि कोरोना महामारीचा उद्रेक झाला. त्यांचे काम आणि पगार थांबला. साथ आटोक्यात येईल आणि पुन्हा सर्वकाही सुरळीत होईल या आशेवर मागचे वर्ष गेले. यावर्षी पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाला व महिनाभरापासून कडक लॉकडाऊन लागू झाला. गृहकर्ज वेळेत न भरल्यास बँक आपल्या घराचा लिलाव करू शकते अशी भीती त्यांना सतावत होती.
रविवारी रात्री त्यांची पत्नी, पाच वर्षांची मुलगी आणि एक वर्षाच्या मुलासह शेजारच्या खोलीत झोपले होते, तर दुसऱ्या खोलीत असलेल्या राजेंद्र यांनी रात्री छताच्या पंख्याला दोरीने गळफास घेतला. नेहमीप्रमाणे पहाटे पाच वाजता झोपेतून उठलेल्या त्यांच्या पत्नीला हा प्रकार नजरेस पडला. त्यांनी आरडाओरड केल्यावर शेजारी आणि नातेवाईक धावले. त्यांनी राजेंद्र यांना बेशुद्धावस्थेत घाटीत नेले. डॉक्टरांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याविषयी हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार डी. आर. जरारे तपास करीत आहेत.
ना चिठ्ठी, ना बँकेची नोटीस
पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी वगैरे काहीही लिहिलेली नाही. उपरोक्त माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. शिवाय कर्जदार बँकेने त्यांना कर्जफेडीसाठी काही नोटीसही बजावलेली नव्हती.