लॉकडाऊन रद्दचा जल्लोष पडला महागात; खा. इम्तियाज जलील यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 16:52 IST2021-03-31T16:49:13+5:302021-03-31T16:52:24+5:30
Filed charges against MP Imtiaz Jalil and his supporters लॉकडाऊन रद्दची माहिती मिळताच खा. इम्तियाज जलील यांचे २५ ते ३० समर्थक त्यांच्या घरासमोर जमले.

लॉकडाऊन रद्दचा जल्लोष पडला महागात; खा. इम्तियाज जलील यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल
औरंगाबाद: जिल्ह्यातील प्रस्तावित लॉकडाऊन अंमलबजावणी होण्याच्या २ तास आधी जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला. यामुळे लॉकडाऊनला तीव्र विरोध असणाऱ्या खासदार इम्तियाज जलिल यांनी समर्थकांसोबत रात्री १०. ४५ वाजेच्या दरम्यान रस्त्यावर जल्लोष केला. यावेळी कोरोना नियम आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याने खा. जलील यांच्याविरोधात सिटीचौक ठाण्यात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
३१ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने केली होती. लॉकडाऊनचा निर्णय झाल्यापासून खा. जलील यांनी यास विरोध दर्शवला आणि ३१ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनता मोर्चा काढण्याचे जाहीर केले . मंगळवारी प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत लॉकडाऊनवरुन लोकप्रतिनिधींचा रोष उफाळून आला. यासोबतच अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी लॉकडाऊनच्या निर्णयास विरोध दर्शवला. यानंतर अंमलबजावणीस केवळ दोन तास बाकी असताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊन पुढील आदेश येईपर्यंत रद्द केला.
याची माहिती मिळताच संचारबंदी असतानाही लॉकडाऊनला तीव्र विरोध करणारे खा. इम्तियाज जलील यांचे २५ ते ३० समर्थक त्यांच्या घरासमोर जमले. तेव्हा खा. जलील यांनी घरासमोरील रस्त्यावर समर्थकांसह जल्लोष केला. याची माहिती मिळताच सिटीचौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय पवार हे घटनास्थळी पोहोंचले. यावेळी खा. जलील आणि त्यांच्या समर्थकांनी मास्क न वापरणे, सोशल सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे अशा कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. पोलीस निरीक्षक पवार यांनी जमावास गर्दी न करता निघून जाण्यास सांगितले. यानंतर बुधवारी दुपारी सिटीचौक पोलीस ठाण्यात खा. इम्तियाज जलील यांच्यासह माजी नगरसेवक नासेर सिद्दिकी, विकास एडके, आरेफ हुसैन, अब्दुल समीर अब्दुल साजेद, शारेक नक्षबंदी, इम्रान सालार, इसाख पठाण, अखिल सागर, मोहम्मद सोहेब यांच्याविरोधात भादवि कलम १४३, १८८ २६९,२७० सह कलम ११ महाराष्ट्र कोविड- १९ यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
माझ्यावर कायद्यानुसार कारवाई करा
दरम्यान, प्रसार माध्यमांशी संवाद साधताना खा. इम्तियाज जलील म्हणाले, मंगळवारी रात्री लॉकडाऊन रद्द झाल्याची पुष्टी करण्यासाठी काही लोक माझ्याकडे आले होते. त्यांना मी एकत्र केले नव्हते. त्यांनी आनंदाच्या भरात मला उचलून घेतले. यावेळी इतके लोक जमा झाले आहेत याची माहिती नव्हती. आम्ही गरिबांसाठी लॉकडाऊनच्या विरोधात होतो ते साध्य झाले आहे. त्यानंतर मी मास्क घातला नाही आणि सोशल डिस्टसिंगचे पालन केले नसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात माझी चूक झाली आहे, यामुळे पोलिसांनी यावर कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कायद्याची माहिती घेऊन बोलावे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.