सेतू सुविधा केंद्राला ठोकले कुलूप
By Admin | Updated: June 24, 2014 00:43 IST2014-06-24T00:29:13+5:302014-06-24T00:43:03+5:30
सेलू : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व शेतकऱ्यांची पिळवणुक होत असून केंद्राकडून कुठलेच काम मुदतीत होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे़

सेतू सुविधा केंद्राला ठोकले कुलूप
सेलू : येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्रात विद्यार्थी व शेतकऱ्यांची पिळवणुक होत असून केंद्राकडून कुठलेच काम मुदतीत होत नसल्यामुळे विद्यार्थी व शेतकऱ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे़ त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी २३ जून रोजी सेतू सुविधा केंद्राला कुलूप ठोकून तहसीलदार आसाराम छडीदार यांना घेराव घातला.
शासनाने सामान्य जनतेसाठी शासकीय कागदपत्रे सोयीस्कर पद्धतीने मिळावेत या हेतूने सेतू सुविधा केंद्राची स्थापना केली़ परंतू येथील सेतू सुविधा केंद्राचे संचालक मनमानी कारभार करीत असून शेतकरी व विद्यार्थ्यांची आर्थिक लुट करत आहेत़ यामुळे सर्वच जण त्रस्त झाले आहेत़ या प्रकाराकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत आहे़ केंद्रातून अनेक विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या संचिका गलथान कारभारामुळे गहाळ झाल्या आहेत़ त्याचा नाहक त्रास शेतकरी व विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो़ तसेच सेतू केंद्रात अनेक प्रमाणपत्राचे नमुने उपलब्ध नाहीत़
दलालकडून आलेल्या कामांना सेतूच्या संचालकाकडून प्राधान्य दिले जात आहेत व सर्वसामान्यांची पिळवणूक करीत असल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत केंद्राला कुलूप ठोकत तहसीलदारांना घेराव घातला़ या आंदोलनात संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छगन शेरे, रणजित चव्हाण, रामेश्वर शेरे, महेश मुसळे, विक्रांत पाटील, ऋषी चट्टे, अॅड़ उमेश काष्टे, अमोल शेवाळे, भागवत मगर, शशांक टाके, संदीप डाके, श्रीराम डासाळकर, शिवाजी पांचाळ आदीजण सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक
२४ तासात प्रलंबित प्रमाणपत्रे देण्याचे आश्वासन तहसीलदारांनी देत संबंधितांवर कार्यवाही करणार असल्याचे सांगितल्यानंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले़ कार्यालयाला कुलूप ठोकल्यामुळे परिसरामध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़