लोडशेडिंगने फोडला शहरवासीयांना घाम; ऐन उन्हाळ्यात अचानक वीजपुरवठा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 15:24 IST2022-04-08T15:24:07+5:302022-04-08T15:24:51+5:30
ऐन सायंकाळीही भारनियमन झाल्याने वर्क फाॅर्म होम, ऑनलाईन शिक्षण, व्यवसायात व्यत्यय निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

लोडशेडिंगने फोडला शहरवासीयांना घाम; ऐन उन्हाळ्यात अचानक वीजपुरवठा खंडित
औरंगाबाद : शहरातील ज्या भागात थकबाकी व वीजवितरण हानी अधिक आहे, अशा १५ फीडरवर गुरुवारी महावितरणकडून विजेच्या वाढत्या मागणीमुळे भारनियमन करण्यात आले. गेले काही दिवस सकाळच्या वेळेत भारनियमन केले जात होते. परंतु गुरुवारी दुपारी आणि सायंकाळी विविध भागांत दोन ते साडेतीन तास वीज ‘गुल’ झाली. त्यामुळे उकाड्याने घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर ओढावली.
२९ मार्चला पहिल्यांदा भारनियमन झाले होते. त्यानंतरही काही दिवस भारनियमन झाले. आतापर्यंतच झालेले भारनियमन हे सकाळी होते, शिवाय त्याचा कालावधीही एक तासापेक्षा कमी होता. त्यामुळे फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र, गुरुवारी १५ फिडरवर दुपारी ४ वाजल्यानंतर लोडशेडिंग करण्यात आले. ऐन सायंकाळीही भारनियमन झाल्याने वर्क फाॅर्म होम, ऑनलाईन शिक्षण, व्यवसायात व्यत्यय निर्माण झाल्याने नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याबरोबर बौद्धनगरसह परिसरातील बुधवारी दुपारी वीज खंडित झाली. ऐन उन्हाळ्यात अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचाही प्रकार होत आहे.
या भागातील वीज ‘गुल’
११ केव्ही सारा सिद्धी फिडर, सातारा परिसरातील खंडोबा फिडर, पेठेनगर, रंगमंदिर, दूध डेअरी, रेल्वे स्टेशन रोड, देवगिरी व्हॅली, निजामुद्दीन, नक्षत्रवाडी, पैठण गेट, रामगोपाल फिडर, पोलीस काॅलनी, गणेश काॅलनी, सेव्हन हिल या फिडरवर भारनियमन करण्यात आले. काही भागात दुपारी ३.५५ ते ७.३० वाजेदरम्यान, काही भागांत सायंकाळी ५ ते ६.३५ तर काही भागांत सायंकाळी ५ ते ७.३० वाजेदरम्यान लोडशेडिंग करण्यात आले.
विजेची वाढती मागणी
विजेची मागणी वाढत आहे. विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल साधण्यासाठी भारनियमन करण्यात आले. नादुरुस्तीमुळे काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता.
- प्रकाश जमधडे, अधीक्षक अभियंता, महावितरण