चारा संपल्याने पशुधन संकटात
By Admin | Updated: June 21, 2014 00:52 IST2014-06-21T00:15:16+5:302014-06-21T00:52:05+5:30
रमेश शिंदे, औसा मृग नक्षत्र निघून दहा दिवस उलटले, पण अजून पावसाचा पत्ता नाही. पाऊस न झाल्यामुळे आता पेरण्यांना तर उशीर होणार आहे.
चारा संपल्याने पशुधन संकटात
रमेश शिंदे, औसा
मृग नक्षत्र निघून दहा दिवस उलटले, पण अजून पावसाचा पत्ता नाही. पाऊस न झाल्यामुळे आता पेरण्यांना तर उशीर होणार आहे. पण आता शेतकऱ्यांजवळ असणारा चाराही संपला आहे. त्यामुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
औसा तालुक्यात २०१३-१४ च्या खरीप हंगामात ८३ हजार ६९९ हेक्टर्स क्षेत्रावर खरीप हंगामाची पेरणी झाली होती. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र हे ३६ हजार २०० हेक्टर्स जमिनीवर सोयाबीनची पेरणी झाली होती. तर त्यापूर्वी २०१२-१३ च्या खरीप हंगामात ४६ हजार ४६० हेक्टर्स क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. यावर्षीही पेरण्यांना उशीर झाला, तर सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. मागील वर्षी सर्वाधिक सोयाबीनच्या पेरणीनंतर १८ हजार ९०० हेक्टर्स क्षेत्रावर तूर तर १३ हजार २०० हेक्टर्स क्षेत्रावर खरीप ज्वारी ही पिके घेण्यात आली होती. यावर्षीही पेरण्यांना उशीर होत असल्यामुळे सोयाबीन, तूर व संकरीत ज्वारी या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
मागील पाच-सहा वर्षांपासून औसा तालुक्यातील शेतकरी आणि मृग नक्षत्रातील पेरण्या यांचे नाते जुळत नाही. पेरण्यांना उशीर होत असल्यामुळे तालुक्यातील पीक पद्धतीत बदल होत आहे. उडीद-मूग या नगदी पिकांची जागा आता सोयाबीनने घेतली आहे. सोयाबीन पिकाला खर्च जरी थोडा-अधिक होत असला तरी उत्पादनही चांगले निघत असल्याने दिवसेंदिवस सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होत आहे. तर चारा म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी संकरीत ज्वारी पेरणी करतो. तेही क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटत असल्याने चाऱ्याची टंचाई निर्माण होत आहे. सध्या शेतकऱ्यांकडील चारा संपल्याने पशुधन मात्र संकटात सापडले आहे. एकूणच पावसाअभावी शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे.
अपेक्षा ठरल्या फोल़़़
यावर्षी उन्हाळाभर अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पेरण्यासाठीही वेळेवर पाऊस पडेल आणि मृग नक्षत्रात पेरण्या होतील ही शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मृग नक्षत्राचे दहा दिवस उलटले, पण अजूनही पावसाची सुरुवात झाली नाही. आता जरी पावसाला सुरुवात झाली तरी पेरण्या मात्र आर्द्रा नक्षत्रातच होण्याची शक्यता आहे.