पहिल्या मजल्यावरून पडल्याने दोनवर्षीय चिमुकलीचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 00:52 IST2018-08-15T00:52:39+5:302018-08-15T00:52:53+5:30
गॅलरीत खेळताना लोखंडी पहिल्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री मृत्यूू झाला.

पहिल्या मजल्यावरून पडल्याने दोनवर्षीय चिमुकलीचा अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गॅलरीत खेळताना लोखंडी पहिल्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री मृत्यूू झाला. ही घटना चिश्तिया कॉलनीत १२ आॅगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
उमेरा अकबर शेख (वय २ वर्षे, रा. चिश्तिया कॉलनी, सिडको एन-६) असे मृत बालिकेचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना सिडको पोलिसांनी सांगितले की, अकबर शेख हे चिश्तिया कॉलनी घर भाड्याने घेऊन राहतात. ते हमाल काम करतात तर त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांना चार मुली आणि मुलगा आहे. मृत उमेरा ही जुळ्यांपैकी एक होती. १२ रोजी ते कामावर गेले होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घरात जेवण करीत होती, तर उमेरा ही तिच्या बहिणी आणि जुळ्या भावासोबत पहिल्या मजल्यावरील घरासमोरील गॅलरीत खेळत होती. नेहमीप्रमाणे ती आणि अन्य चिमुकले गॅलरीतून खाली डोकावत
होते.
यावेळी अचानक उमेरा गॅलरीतील लोखंडी ग्रीलवर चढून खाली पाहू लागली. खाली डोकावताना तोल जाऊन ती खाली कोसळली. या घटनेनंतर आरडाओरड झाल्याने तिची आई आणि गल्लीतील अन्य लोकांनी तातडीने तिला एमजीएम रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्टरांनी तिची प्रकृती पाहून अधिक उपचारासाठी घाटीत जाण्याचा सल्ला दिला. घाटीत तिच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री उमेराची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी सिडको ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.