बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला, वारसांना भरपाईसह सरकारी नोकरी मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 19:54 IST2025-12-16T19:54:16+5:302025-12-16T19:54:38+5:30
राज्यात वाघ, बिबटे व इतर वन्यजीवांकडून होणारे हल्ले आता राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावला, वारसांना भरपाईसह सरकारी नोकरी मिळणार
छत्रपती संभाजीनगर : राज्यात वाघ, बिबटे यासह वन्यजीवांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. यात गेल्या काही दिवसांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातदेखील आपत्तीच्या घटना पुढे आल्या आहेत.
राज्य आपत्तीचा दर्जा
राज्यात वाघ, बिबटे व इतर वन्यजीवांकडून होणारे हल्ले आता राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यात आले आहेत. ‘राज्य आपत्ती’चा दर्जा देण्यात आल्याने मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक व सामाजिक आधार मिळणार आहे.
असा बदल होणार..
राज्य आपत्तीचा दर्जा मिळाल्याने भरपाई, मदत व पुनर्वसन प्रक्रिया वेगाने आणि व्यापक होणार आहे. वन्यजीवाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत सामावून घेतले जाणार आहे.
जखमी, अपंगत्व आल्यास साहाय्य
हल्ल्यात गंभीर जखमी किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास नियमांनुसार आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
वर्षभरात किती हल्ले?
- ४६८ वन्यजीव हल्ले पशुधनावर झाले
- ३ नागरिकांचा मृत्यू
उपाययोजना काय?
- वनक्षेत्रात गस्त वाढवली
- पिंजरे व कॅमेरे बसवले
- जनजागृती व सतर्कता मोहीम
- तातडीच्या बचाव पथकांची नेमणूक
प्रतिबंधात्मक उपायांवरही भर
वन्यजीवांनी केलेल्या हल्ल्यांना राज्य आपत्तीचा दर्जा दिल्यामुळे पीडित कुटुंबांना तत्काळ न्याय व मदत मिळेल. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्यात येईल, अशी अधिवेशनात घोषणा झाली आहे. अद्याप जीआर आला नाही. काय पद्धती आहे त्यावर निर्णय घेतला जाईल; परंतु संघर्ष कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांवरही भर देण्यात येत आहे.
-सागर कुटे, प्रादेशिक वन परिक्षेत्र अधिकारी