चिमुकल्यांना धडे देणार
By Admin | Updated: December 24, 2014 01:03 IST2014-12-24T00:33:15+5:302014-12-24T01:03:56+5:30
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद इयत्ता पाचवीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन व गणन ही प्राथमिक शिक्षणातील औपचारिक मूलभूत कौशल्यही आत्मसात केली नसल्याचे अनेक पाहण्यातून समोर येत aahe

चिमुकल्यांना धडे देणार
शांतीलाल गायकवाड, औरंगाबाद
इयत्ता पाचवीपर्यंतच्या अनेक विद्यार्थ्यांनी वाचन, लेखन व गणन ही प्राथमिक शिक्षणातील औपचारिक मूलभूत कौशल्यही आत्मसात केली नसल्याचे अनेक पाहण्यातून समोर येत असल्यामुळे या विद्यार्थ्यांची मूलभूत अध्ययन क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षण विभागाने गुणवत्ता वाढीसाठी तीन महिन्यांचा ‘वाचन, लेखन व गणित विकास कार्यक्रम’ हाती घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम ६ जानेवारीपासून राबविण्यात येणार असला तरी त्यापूर्वी शिक्षकांना चार दिवसांचे प्रशिक्षण देऊन तयार केले जाणार आहे.
जिल्हा परिषद, नगर परिषद व महापालिकेतील इयत्ता दुसरी ते पाचवीच्या मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना ‘अक्षर ओळखीपासून संख्या बोधापर्यंत ’, हळूहळू विस्तारत जाणाऱ्या ज्ञानाची ओळख व्हावी हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. त्यासाठी येत्या शुक्रवारपासून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांतून शिकविणाऱ्या शिक्षकांना वाचन, लेखन, गणित विकास कार्यक्रमांतर्गत केंद्रस्तरावर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
विद्यार्थ्यांची अगोदर चाचणी
शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण विस्तारीकरणास खऱ्या अर्थाने प्रारंभ होईल दि. ५ जानेवारी २०१५ पासून होणाऱ्या पायाभूत चाचणीने. यात विद्यार्थ्यांना भाषा व गणित विषयात किती प्रारंभिक ज्ञान आहे, याची चाचपणी करण्यात येईल. विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेली संपादणूक पातळी सांख्यिकी माहितीद्वारे नोंदवून ठेवण्यात येईल. यात बालकांचा अध्ययन स्तर तपासून निश्चित केला जाणार आहे.
६ जानेवारीपासून रोज मध्यान्ह भोजनाच्या सुटीपूर्वी २ तास वाचन, लेखन, गणित विकास कार्यक्रमाचे नियोजन शाळा पातळीवर होईल. दि. ३१ मार्च २०१५ रोजी उत्तर चाचणीने या गुणवत्ता विकास कार्यक्रमाचा समारोप होईल. तेव्हा प्राप्त सांख्यिकी माहितीचे विश्लेषण व अर्थ विवेचन करून जिल्ह्यातील जि. प. शाळांच्या गुणवत्तेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण पुणे व महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई हे निष्कर्ष काढतील. हा उपक्रम प्रथमच्या सहकार्याने राबविला जात आहे.
वसंत पुरके शिक्षणमंत्री असताना हाच कार्यक्रम शाळा भरण्यापूर्वी २ तास व सुटल्यानंतर २ तास, अशा स्वरूपात राबविण्याचा प्रयत्न झाल्यावर शिक्षक संघटनांनी त्याला कडाडून विरोध केला होता. त्यात प्राथमिक शिक्षक संघ आघाडीवर होता.
आता हा कार्यक्रम शाळेच्या वेळेतच असल्यामुळे आम्ही तो यशस्वी करू असे शिक्षक संघाचे संजीव बोचरे, सुनील चिपाटे, मनोज चव्हाण, संजय पुंगळे आदींनी म्हटले आहे.