छत्रपती संभाजीनगर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा राजकीय उलटफेर झाला आहे. विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्याविरोधात २०२४ ची विधानसभा निवडणूक लढवणारे आणि जवळपास १ लाखांहून अधिक मते मिळवणारे राजू शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) सोडून पुन्हा आपल्या मूळ पक्षात, भारतीय जनता पक्षात, 'घरवापसी' केली आहे. मुंबई येथे भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजयजी केणेकर, शहर अध्यक्ष किशोर शिटोळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी प्रवेश करत शहर आणि जिल्हा भाजपमय करण्याचा निर्धार व्यक्त करत दोन्ही सेनेच्या विरोधात शड्डू ठोकले.
'तांत्रिक अडचण होती म्हणून तिकडे गेलो'राजू शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश केला होता आणि संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून शिरसाट यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. आता भाजपमध्ये परतताना त्यांनी आपल्या जुन्या कृतीचे स्पष्टीकरण देताना शिरसाटांवर अप्रत्यक्ष टीका केली. "मध्यंतरी तांत्रिक अडचण होती म्हणून तिकडे गेलो होतो. आपल्याच जीवावर जे मोठे झाले होते त्यांनाच धडा शिकवण्यासाठी आम्ही तिकडे गेलो होतो," अशी टीका त्यांनी संजय शिरसाट यांचे नाव न घेता केली. "भाजपवर नाराज कधीच नव्हतो. आमचा देव तोच होता, आता पण बदलणार नाही," असे भावनिक विधान करत त्यांनी भाजपवरील निष्ठा पुन्हा व्यक्त केली.
शहर आणि जिल्ह्यात 'शतप्रतिशत भाजप'चा एल्गारराजू शिंदे यांच्यासह छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीणमधील अनेक ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. राजू शिंदे यांनी यावेळी जोरदार 'राजकीय शड्डू' ठोकला, "छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे एक हाती वर्चस्व ठेवल्याशिवाय राहणार नाही. अतुल सावेंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करु. दोन्ही सेना (ठाकरे गट आणि शिंदे गट) संपवून शहर आणि जिल्ह्यात शतप्रतिशत भाजप केल्याशिवाय राहणार नाही."
आपले समाधान झाल्यावरच जबाबदारी द्यावी, अशी विनंती त्यांनी मंत्री अतुल सावे यांना केल्याचेही सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भाजपची ताकद वाढली असून, दोन्ही शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Web Summary : Raju Shinde, a rival of Sanjay Shirsat, rejoined BJP from the Thackeray group, citing technical issues for his departure. He aims to establish BJP's dominance in Chhatrapati Sambhajinagar, uniting city and rural areas, posing a challenge to both Shiv Sena factions before local elections.
Web Summary : संजय शिरसाट के प्रतिद्वंद्वी राजू शिंदे, ठाकरे गुट से भाजपा में फिर शामिल हुए, अपनी विदाई के लिए तकनीकी मुद्दों का हवाला दिया। उन्होंने छत्रपति संभाजीनगर में भाजपा का वर्चस्व स्थापित करने, शहर और ग्रामीण क्षेत्रों को एकजुट करने का लक्ष्य रखा है, जो स्थानीय चुनावों से पहले दोनों शिवसेना गुटों के लिए एक चुनौती है।