बिबट्या शिकारीसाठी निघाला अन् विहिरीत जाऊन पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 17:58 IST2021-11-25T17:56:37+5:302021-11-25T17:58:13+5:30
वन विभाग आणि पोलीस पथकाने तीन तासांच्या परिश्रमाने बिबट्याला बाहेर काढले

बिबट्या शिकारीसाठी निघाला अन् विहिरीत जाऊन पडला
नाचनवेल (औरंगाबाद ) : भक्ष्याचा पाठलाग करत असताना अंदाज न आल्याने बिबट्या शेतातील एका विहिरीत पडल्याची घटना आज सकाळी कन्नड तालुक्यातील आमदाबाद शिवारात उघडकीस आली. तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला बाहेर काढण्यास यश आले आहे.
आमदाबाद शिवारात रामकृष्ण पुंडलिक बनकर यांचे शेत आहे. संतोष बनकर हे आज सकाळी मजुरांना पाणी आणून देण्यासाठी विहिरीवर गेले.यावेळी विहिरीत बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याची माहिती लागलीच ग्रामस्थ आणि वनविभागाला दिली. माहिती मिळताच पोलीस तसेच वनविभागाचे कर्मचारी शेतात दाखल झाले.
पोलीस उपनिरीक्षक हरिशकुमार बोराडे व सहाय्यक वनसंरक्षक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.ए.शेख, वसंत पाटील, एस.एम.माळी, अमोल वाघमारे प्रकाश सुर्यवंशी, हरसिंग गुसिंगे आदींनी तीन तास परिश्रम घेत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, जंगलालगतच्या भागात वन्यजीव समृद्धी वाढल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. यामुळे वन विभागाने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांनी केली आहे.