बिबट्या परतलाय! छत्रपती संभाजीनगरकरांना सीसीटीव्ही तपासण्याची लागलीय सवय
By साहेबराव हिवराळे | Updated: July 30, 2024 20:21 IST2024-07-30T20:20:53+5:302024-07-30T20:21:08+5:30
नऊ दिवसांनंतर शनिवारी पहाटे चिकलठाणा एमआयडीसीत बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले.

बिबट्या परतलाय! छत्रपती संभाजीनगरकरांना सीसीटीव्ही तपासण्याची लागलीय सवय
छत्रपती संभाजीनगर : मोबाईल सतत पाहण्याची अनेकांना सवय असते. याच धर्तीवर आता अनेकजण सतत सीसीटीव्ही पाहत आहेत. कारण शहरात बिबट्या परतला असून, तो मोकाट फिरत आहे. तो आपल्या परिसरात तर आला नाही ना? या भीतीपोटी बरेच जण हे फुटेज तपासत आहेत.
नऊ दिवसांनंतर शनिवारी पहाटे चिकलठाणा एमआयडीसीत बिबट्याचे पुन्हा दर्शन झाले. एनएचके कंपनीच्या कुंपणावर सुरक्षारक्षकांना बिबट्या दिसला. काही वेळातच बिबट्या तेथील झुडपात पसार झाला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक परिसरात दाखल झाले. कंपनीच्या आवारात बिबट्याच्या पायांचे ठसे आढळून आले. झाडाखाली तो काही वेळ दबा धरून असल्याचा खुणा आढळल्या आहेत. रेल्वे स्टेशन परिसरातील राहुलनगर येथील बनेवाडी परिसरात देखील बिबट्या दिसल्याची माहिती वनविभागाला मिळाली आहे.
नारेगाव परिसरात...
नारेगाव परिसरातील एका बर्फाच्या कारखान्यातील अश्विनी फुंदे या मुलीने सोमवारी सकाळी बिबट्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून जाताना पाहिला. पण, बाजूच्या कारखान्यातील फुटेज तपासण्यात आले, त्यात काही दिसले नाही. ठसेही जुळत नसल्याचे पथकाने सांगितले.
संशयास्पद काही नाही..
घाबरू नका, परंतु दक्षता ठेवा. फोन आला तेथे वनपाल अप्पासाहेब तागड, सर्पमित्र नितीन जाधव, नागरिक सुरेश मगरे यांच्यासह पाहणी केली. गस्त सुरू आहे.
- दादा तौर, वनपरिक्षेत्र अधिकारी
फोन तपासला जातो, तसेच फुटेजही...
सीसीटीव्हीचे रोजचे फुटेज तपासण्याची सवय नागरिकांना लागली आहे. भीतीपोटी पाहावे लागते.
- मनोज गांगवे, माजी नगरसेवक, एन-१, सिडको
सध्या परिसर शांतच
ज्यांच्याकडे सीसीटीव्ही जोडणी आहे, ते दररोज रात्री आपल्या गल्ली व परिसरातून बिबट्या तर गेला नसावा ना, अशी शंका म्हणून फुटेज अधूनमधून तपासले जातात. सध्या परिसर शांत आहे.
- स्मिता घोगरे, माजी उपमहापौर, उल्कानगरी
शंका समाधान होते..
औद्योगिक क्षेत्रात आल्याचे कळल्याने रस्त्यावर बिबट्या आला की काय, या भीतीचे फुटेज पाहून निरसन होते.
- जितेंद्र जाधव, ब्रिजवाडी