औरंगाबादमधील सिडको एन- १ भागात बिबट्या; वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 12:01 IST2019-12-03T11:25:05+5:302019-12-03T12:01:33+5:30
पोलीस, मनपा आणि वन विभागाचे कर्मचारी परिसरात असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

औरंगाबादमधील सिडको एन- १ भागात बिबट्या; वन विभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु
औरंगाबाद : शहरातील सिडको एन - १ भागातील काळ्या गणपती मागील गार्डनमध्ये सकाळी ६.३० वाजेच्या दरम्यान मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना बिबट्या दिसला. यामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी येथे दाखल झाले आहेत.
गार्डनमध्ये जवळपास दहा मिनिट फिरल्यानंतर बाजूच्या हनुमान मंदिरातून त्या लगतच्या एका घराच्या अंगणात बिबट्या गेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शि विजय पवार आणि विजय पाटणेकर यांनी दिली आहे. या एन- १ मधील गार्डनमधील दाट झाडीत बिबट्या असल्याची शक्यता असल्याने वन विभागातर्फे तेथे सापळा लावण्यात आला आहे.
दरम्यान, बिबट्या दिसल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने या भागात बघ्यांनी गर्दी केली आहे. पोलीस, मनपा आणि वन विभागाचे कर्मचारी परिसरात असून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. कन्नड येथील रेंजर त्यांच्या टीमसह दाखल झाले असून त्यांनी परिसराचा अंदाज घेत बिबट्या कुठे असू शकतो त्यानुसार सापळा लावला आहे. यासोबतच पोलीस उपायुक्त राहुल खाडे, निकेस खाटमोडे, पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे हे घटनास्थळी असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त येथे ठेवण्यात आला आहे.