विद्यापीठात येणार विधिमंडळ समिती

By Admin | Updated: January 17, 2016 00:04 IST2016-01-16T23:28:58+5:302016-01-17T00:04:28+5:30

औरंगाबाद : विमुक्त जाती- भटक्या जमाती विधिमंडळ समिती २८ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार आहे.

Legislature committee will be going to the university | विद्यापीठात येणार विधिमंडळ समिती

विद्यापीठात येणार विधिमंडळ समिती

औरंगाबाद : सहायक कुलसचिव आणि उपकुलसचिव पदाच्या भरतीत भटक्या आणि विमुक्त जाती जमातीच्या आरक्षणासंदर्भात केलेले बदल आणि त्याबाबत राज्यपालांसह समितीकडे झालेल्या तक्रारींची दखल घेऊन विमुक्त जाती- भटक्या जमाती विधिमंडळ समिती २८ जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येणार आहे.
समितीतील एक सदस्य आ. हरिभाऊ राठोड यांनी लोकमतशी बोलताना या बाबीला दुजोरा दिला. विद्यापीठात पाच वर्षांपूर्वी सहायक कुलसचिव आणि उपकुलसचिवपदाची भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र ती अद्यापपर्यंत पूर्ण झाली नाही. या दोन्ही पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवार डॉ. सुनीता राठोड यांना पात्र असतानाही निवड समितीने डावलल्याचा तसेच भरती प्रक्रियेत व्हीजेएनटी ‘अ’ ची जागा ‘ब’ ला देण्याचा घाट घातला जात असल्याची तक्रार समितीकडे केली होती.
निवड प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने राबविली गेल्याचेही तक्रारीत म्हटले होते. याबाबत राज्यपालांकडेही तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची विमुक्त जाती- भटक्या जमाती विधिमंडळ समितीने दखल घेतली असून, यासंदर्भात विद्यापीठाला सुमारे चाळीस प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगितले आहे. विद्यापीठातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाने घाईघाईने या ४० प्रश्नांची उत्तरे समितीकडे पाठविली आहेत.
विधिमंडळ समितीला कायदेशीर अधिकार असतात. समितीच्या अध्यक्षांसह सदस्य असणारे सहा आमदार आणि विविध खात्यांचे अधिकारी २८ रोजी विद्यापीठात येणार आहेत. आरक्षण कायद्याचा भंग केला असल्याचे आढळल्यास समिती कायदेशीर कारवाईची शिफारसही करू शकते. या प्रकरणी शिक्षेचीही तरतूद आहे. यामुळे समितीसमोर विद्यापीठाची कसोटी लागणार आहे.

Web Title: Legislature committee will be going to the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.