तहसील कार्यालय इमारतीला गळती
By Admin | Updated: August 8, 2016 00:40 IST2016-08-08T00:35:17+5:302016-08-08T00:40:02+5:30
उस्मानाबाद : तहसील कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीला गळती लागली आहे. गळती थांबविण्यासाठी तहसील प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम

तहसील कार्यालय इमारतीला गळती
उस्मानाबाद : तहसील कार्यालयासाठी उभारण्यात आलेल्या इमारतीला गळती लागली आहे. गळती थांबविण्यासाठी तहसील प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही अद्याप दुरूस्ती झालेली नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे.
तहसील कार्यालयासाठी इमारत उभारून काही वर्षांचाच कालावधी लोटला आहे. असे असतानाच सदरील इमारतीच्या छताला गळती लागली आहे. पाऊस सुरू असताना अक्षरश: कार्यालयामध्ये पाण्याचा ढव साचतो. त्यामुळे अशा कार्यालयात बसून कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण झाले आहे. तसेच काही महत्वाच्या संचिकाही या पाण्यामुळे भिजल्या आहेत. फर्निचरचेही नुकसान होत आहे. कार्यालयात सातत्याने पाणी साचून राहात असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरण असते.
दरम्यान, सदरील कार्यालयाची गळती थांबविण्याबाबत (दुरूस्ती करणे) तहसील प्रशासनाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सातत्याने पाठपुरवा करण्यात येत आहे. तसेच पत्रव्यवहारही सुरू आहे. परंतु, बांधकाम विभागाने सदरील पत्राला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे अर्धाअधिक पावसाळा सरत आला असतानाही तहसील कार्यालय इमारतीची गळती रोखण्यात आलेली नाही. अशा कार्यालयात बसून कामकाज करणे कठीण झाले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षित कारभाराचा फटका येथील कर्मचाऱ्यांसोबतच बाहेरगावाहून कामानिमित्त येथे येणाऱ्या नागरिकांनाही सोसावा लागत आहे. त्यामुळे सदरील इमारतीची गळती रोखण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला मुहूर्त मिळणार कधी? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. (प्रतिनिधी)