लाल बावटा पुन्हा भेटला
By Admin | Updated: December 30, 2014 01:16 IST2014-12-30T01:14:07+5:302014-12-30T01:16:33+5:30
उस्मानाबाद: ‘हे तुम्हीच सांगितले पाहिजे, म्हणून बोलतो आहे. कुठेतरी पुन्हा भेटणार म्हणून चालतो आहे. थकणार नाही, वाकणार नाही, तुमचे इमान विकणार नाही’,

लाल बावटा पुन्हा भेटला
उस्मानाबाद:
‘हे तुम्हीच सांगितले पाहिजे,
म्हणून बोलतो आहे.
कुठेतरी पुन्हा भेटणार
म्हणून चालतो आहे.
थकणार नाही, वाकणार नाही,
तुमचे इमान विकणार नाही’,
अशा शब्दांत कविवर्य फ.मु. शिंदे यांनी भाई उद्धवराव पाटील यांना काव्यात्मक सलाम केला होता. शेकापचे झुंजार नेते उद्धवरावांच्या त्याच लालबावट्याच्या आठवणी सोमवारी पुन्हा एकदा त्यांच्या जन्मभूमीत जाग्या झाल्या. राज्याच्या राजकारणात सामाजिक, आर्थिक सुधारणांचा विचार आपल्या कृतीशील आचारणातून बिंंबविणाऱ्या शेतकरी कामगार पक्षातर्फे सोमवारी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ११ लाखांची मदत तसेच पन्नास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारीही स्वीकारण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील पनवेलचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळाराम पाटील यांचा वाढदिवस पनवेलमध्ये दरवर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याही वर्षी कार्यकर्त्यांनी यानिमित्ताने आठवडाभर भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले. मात्र यंदा राज्यातील मोठा भाग दुष्काळाने होरपळत असताना आपण डामडौल करणे योग्य आहे का? वाढदिवसासाठी कार्यकर्त्यांनी उभा केलेला निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत म्हणून वापरल्यास या पैशाचा खऱ्या अर्थाने विनीयोग होईल, असा विचार आ. विवेक पाटील आणि बाळाराम पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडला. ही संकल्पना कार्यकर्त्यांनीही उचलून धरली. शेकापचे झुंजार नेते भाई उध्ववराव पाटील यांची जन्मभूमी असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याची यासाठी निवड करण्यात आली. पाटील यांनी स्वत: उस्मानाबादच्या जिल्हा पत्रकार संघाला याबाबतची माहिती देवून कार्यक्रमाचे नियोजन करण्यास सांगितले आणि अवघ्या दोन दिवसात शेकापच्या वतीने हा हृदयस्पर्शी उपक्रम राबविण्यात आला.
आ. विवेक पाटील, बळीराम पाटील, प्रकाश म्हात्रे, मल्लिनाथ गायकवाड, सचिन तडफळे, किरण खपले, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश पोतदार आदींच्या उपस्थितीत आत्महत्याग्रस्त शेतकरी बाबासाहेब माणिक जगताप (रुईभर), तानाजी एकनाथ कदम (पांगरधरवाडी), त्रिंबक सोपान चव्हाण (चव्हाणवाडी), बालाजी सुब्राव बागल (शिंगोली), शंकर रामा लांडगे (मेंढा), बापू दगडू गायकवाड (सरमकुंडी) या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना हे मदतीचे धनादेश देण्यात आले. याबरोबरच शेतकरी कामगार पक्षातर्फे गरीब, होतकरु ५० मुलांचे पालकत्वही स्वीकारण्यात आले. त्यापैकी ८ मुलांना प्रातिनिधीक स्वरुपात सोमवारी आयोजित कार्यक्रमात ही मदत देण्यात आली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींना तीस हजार रुपये रोख, सत्तर हजाराची बँक मुदत ठेव आणि आई-वडिलांना प्रत्येकी १० हजार अशी अकरा लाखांची मदत तर दहावीपर्यंतच्या मुलांना शिक्षणासाठी ५ हजार आणि त्यापुढील वर्गातील विद्यार्थ्यांना १० हजार रूपये असे मदतीचे स्वरुप आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र केसकर यांनी तर आभार प्रा. अमोल दिक्षीत यांनी मानले. (जिल्हा प्रतिनिधी)