लेडी सिंघमचा हिसका
By Admin | Updated: June 13, 2014 00:36 IST2014-06-12T23:59:03+5:302014-06-13T00:36:05+5:30
जालना : जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी गुरूवारी दुपारी अचानक मुख्य बाजारपेठेतून, चौकातून व मुख्य मार्गांवरून फेरफटका मारून बेशिस्त वाहनधारकांना चांगलाच प्रसाद दिला.

लेडी सिंघमचा हिसका
जालना : जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी गुरूवारी दुपारी अचानक मुख्य बाजारपेठेतून, चौकातून व मुख्य मार्गांवरून फेरफटका मारून बेशिस्त वाहनधारकांना चांगलाच प्रसाद दिला.
शहरातील सिंधीबाजार, सावरकर चौक, मामा चौक, फूलबाजार, शिवाजी पुतळा तसेच बसस्थानक भागात कोठेही पार्किंग केलेल्या अॅटोरिक्षा चालकांसह दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना पोलिस अधीक्षकांच्या पथकाने मोठा तडाखा दिला.
संपूर्ण शहरात वाहतुकीचे तीन-तेरा वाजले आहेत. शहर वाहतूक पोलिस यंत्रणेचे कोणतेही नियंत्रण राहिले नाही. परिणामी मुख्य बाजारपेठेसह चौक व रस्त्यांवरून सर्वसामान्य नागरिकांना पायी फिरणे सुद्धा मुश्कील बनले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी गुरूवारी खुद्द मुख्य बाजारपेठेत दाखल होऊन बेशिस्त वाहनधारकांना तडाखा दिला.
जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणावर भरती सुरू असताना पोलिस अधीक्षकांनी थोडासा वेळ काढून अचानक मुख्य बाजारपेठेकडे मोर्चा वळविला. त्यांच्या समवेत विशेष पथक होते. या पथकाने सिंंधीबाजारपासून कारवाईस सुरूवात केली.
विविध ठिकाणी वाहतूकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने व हातगाडे उभे होते. पोलिस अधीक्षक ज्योतीप्रिया सिंह यांच्यासह पथकाने या सर्वांना थेट रस्त्यावर उतरून काठीचा प्रसाद दिला. परिणामी या बाजारपेठेत अस्ताव्यस्त वाहने पार्क केलेल्या वाहन धारकात मोठी खळबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून शहरात गर्दीच्या ठिकाणी मुद्दाम वाहतुकीचा खोळंबा होईल, अशा पद्धतीने हातगाड्या लावून व वाहने उभी केली जातात. ग्राहक व पादचारी यांना त्रास देण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील काही जागरूक नागरिकांनी तक्रार केल्या. त्याठिकाणी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी स्वत: उपस्थित राहून कारवाई सुरू केली.
फूलबाजारापाठोपाठ, मामाचौक, सावरकर चौक, सिंधीबाजार, शिवाजी पुतळा व तेथून पुन्हा बसस्थानकाकडे या पथकाने मोर्चा वळविला. एकाच वाहनावर टिबलसीट बसलेल्या व्यक्तींसह भर रस्त्यात वाहने उभी केल्याने दुचाकी व तीनचाकी स्वरांना लाठ्यांचा प्रसाद दिला. भररस्त्यावर हातगाड्या उभे केलेल्या विक्रेत्यांनाही या कारवाईचा फटका बसला.
बसस्थानक परिसरात या पथकाने बेशिस्तपणे उभ्या असलेल्या अॅटोरिक्षा चालकांना चोप दिला.याप्रकाराने काही अॅटोरिक्षाचालकांनी तेथून काढता पाय घेतला. ही कारवाई सुरू असताना काही चौकातील शहर वाहतूक पोलिस शाखेचे कर्मचारी हॉटेल किंवा पानटपऱ्यांवर विसावले होते. त्या कर्मचाऱ्यांचीही पोलिस अधीक्षकांनी भर रस्त्यावर हजेरी घेतली. (वार्ताहर)
अधीक्षकांच्या कारवाईचे उत्स्फूर्त स्वागत
पथकातील कर्मचाऱ्यांनी ठिकठिकाणी अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या तीन व दुचाकीतील हवा सोडून दिली. परिणामी अनेक दुचाकीस्वारांना भर उन्हात वाहने ढकलत नेण्याची वेळ आली. हवा सोडणे, प्लग काढणे, किल्ली हिसकावून घेतल्यामुळे रखरखत्या उन्हात वाहनधारकांना घाम गाळावा लागला.
सिंह यांनी अचानक ही कारवाई सुरू केल्याने सिंधीबाजार भागात नागरिकांसह व्यापाऱ्यांनी त्यांचे हार, पुष्पगुच्छ देऊन जोरदार स्वागत केले. वर्षानुवर्षापासून चौक व मुख्य रस्ते या वाहनधारकांसह विक्रेत्यांमुळे लुप्त झाले आहेत. त्यामुळे आजपासूनची ही कारवाई आणखी कठोर करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.