कोल्हापुरी बंधारे कोरडेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:40 IST2017-08-19T00:40:06+5:302017-08-19T00:40:06+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत.

कोल्हापुरी बंधारे कोरडेच
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. बहुतांशी कोल्हापुरी बंधारेही अजून कोरडेच आहेत. वास्तविक वाहते पाणी असताना साधारणपणे आॅक्टोबर महिन्यात कोल्हापुरी बंधाºयांमध्ये पाणी अडवले जाते; पण यंदाची परिस्थिती बघता सप्टेंबर महिन्यातच काही बंधाºयांचे गेट टाकून पाणी अडवण्यासाठी जिल्हा परिषदेचा सिंचन विभाग सज्ज झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागामार्फ त शेतीची सिंचन क्षमता वाढावी यासाठी गरजेनुसार कोल्हापुरी बंधारे उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमध्ये ५८५ कोल्हापुरी बंधारे पाणी अडविण्यासाठी उपयुक्त आहेत; मात्र कधी अतिवृष्टीमध्ये गेट वाहून गेले, तर कधी शेतकरी किंवा पाणी वाटप संस्थांच्या दुर्लक्षामुळे अनेक बंधाºयांचे गेट चोरीला गेले आहेत. ५८५ बंधाºयांसाठी साधारणपणे २५ हजार ३३२ दरवाजांची गरज आहे. यापैकी सध्या १८ हजार ७१४ दरवाजे उपलब्ध असून, ६ हजार ६१८ दरवाजांची गरज आहे. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे जिल्हा परिषदेने उपकरातून कोल्हापुरी बंधाºयांच्या गेटसाठी अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती.
प्रशासनाने मे २०१६ पासून दरवाजे खरेदीची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी ई-निविदा काढण्यात आली; पण त्याला प्रतिसादच मिळाला नाही. तीन वेळा फेरनिविदा काढूनही गेटसाठी कंत्राटदार पुढे आले नाहीत.
गेट खरेदी आणि बंधारे निवडीवरून सदस्यांनी अनेक सर्वसाधारण सभांमध्ये मुद्दे उपस्थित केले; पण ठोस कारवाई मात्र होऊ शकली नाही. मागील तीन महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली. तेव्हा एक पुरवठादार संस्था पुढे आली. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत दरास मान्यता घेण्यासाठी गेट खरेदीचा प्रस्ताव चर्चेला आला; मात्र त्यावर निर्णय होऊ शकला
नाही.
निविदा प्रक्रियेनुसार अडीच कोटी रुपयांच्या निधीतून ३ हजार ३८ गेट खरेदी केले जाणार असले तरीही बंधाºयांसाठी आणखी ३ हजार ५८० गेट कमीच पडणार आहेत.