कोल्हापूरात तरुणीची आत्महत्या--मूळची औरंगाबादची
By Admin | Updated: September 16, 2014 00:36 IST2014-09-16T00:31:28+5:302014-09-16T00:36:28+5:30
वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरून घेतली उडी

कोल्हापूरात तरुणीची आत्महत्या--मूळची औरंगाबादची
कोल्हापूर : येथील वसतिगृहाच्या चाळीस फूट उंच असलेल्या चौथ्या मजल्यावरून उडी घेऊन गंभीर जखमी झालेल्या छत्रपती प्रमिलाराजे वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या श्रद्धा गंगाधर करे (वय २२, रा. रायगड नगर, सिडको कॉलनी, बळिराम पाटील विद्यालयाजवळ औरंगाबाद) हिचा सीपीआरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. मानसिक ताण-तणावातून तिने आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना आज, सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली.
श्रद्धा करे ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.बी.बी.एस.च्या प्रथम वर्षात शिकत होती. गेली चार वर्षे ती परीक्षेत नापास होत असे. परीक्षेच्या कालावधीत ती चिमाजी चौकातील शल्यचिकित्सकांच्या निवासस्थानाशेजारील शासकीय वसतिगृहात राहत असे. इतरवेळी ती गावी औरंगाबादला राहायची. तिने पाचव्यांदा परीक्षेचा अर्ज भरल्याने ६ सप्टेंबरला ती या वसतिगृहात आली. तिसऱ्या मजल्यावरील रूम नं. ५७ मध्ये मैत्रिणी पूजा डोंगरे व कुमोदिनी डोळस यांच्या सोबत ती राहत होती. काल, रविवारी रात्री जेवण करून आल्यानंतर मैत्रिणींशी गप्पा मारल्या. आजपासून परीक्षा असल्याने रात्री उशिरापर्यंत ती अभ्यास करीत होती. त्यानंतर पहाटे चारच्या सुमारास ती पुन्हा अभ्यासाला उठली. पूजा डोंगरे ही सकाळी परीक्षेसाठी निघून गेली, तर कुमोदिनी झोपली होती. श्रद्धाचा शेंडा पार्क येथे आज अॅनाटॉमीचा पहिला पेपर होता. त्याच्या तयारीत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास तिला मोबाईलवर कॉल आला. फोनवर बोलत ती बाहेर गेली. त्यानंतर पुन्हा रूममध्ये आली. मोबाईल बेडवर ठेवून ती बाहेर गेली. बराच वेळ ती रूममध्ये न आल्याने कुमोदिनी तिला शोधण्यासाठी बाहेर आली. दरम्यान, सफाई कामगार लक्ष्मण पोवार यांना मुलगी पडल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरड केल्याने सविता मिश्राम हिच्यासह वसतिगृहातील मुली खाली पळत आल्या. त्यांनी पाहिले असता ती श्रद्धा असल्याचे लक्षात आले. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. चप्पल बाजूला पडले होते, तर चष्मा फुटला होता. शेजारी तिच्या हातातील अंगठी पडली होती. बेशुद्धावस्थेत सफाई कामगार पोवार यांच्या रिक्षातून तिला सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात हलविले. येथे तज्ज्ञ डॉक्टर तिच्यावर उपचार करीत असताना अखेर तिचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
‘तो’ फोन कोणाचा?
श्रद्धाला सकाळी साडेआठच्या सुमारास मोबाईलवर फोन आला. तो फोन कोणाचा होता. मोबाईलवर अशी काय चर्चा झाली की, तिने नंतर आत्महत्या केली. मोबाईलला पासवर्ड असल्याने ती नेमकी कोणाशी बोलली हे समजले नाही.
चार वर्षे नापास झाल्याने श्रद्धा मानसिक तणावाखाली असे. मोबाईलवर बोलल्यानंतर थेट तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरच्या शिडीवरून चौथ्या मजल्यावर चढूक तिने तेथून खाली उडी मारली. चौथ्या मजल्यावर निळ्या रंगाच्या सहा गोळ्या मिळाल्या. उडी मारण्यापूर्वी तिने औषधे खाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्या तणाव कमी करण्याच्या गोळ्या असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.