छत्रपती संभाजीनगर : शहरात दोन महिन्यांपासून दुचाकीस्वार लूटमारांकडून सातत्याने नागरिकांना लुटले जात आहे. सोमवारी सायंकाळी तीन तासांत मुकुंदवाडी ते सिडको बसस्थानक दरम्यान दोघांना लुटण्यात आले. यात एका तरुणाने विरोध करताच त्याच्यावर चाकूने वार करण्यात आले.
आडुळचे सनावर शेख अनवर (वय २४) हे मित्र सुभाष खरात यांच्यासह सोमवारी सायंकाळी शहरात खरेदीसाठी आले हाेते. मुकुंदवाडीतील पीव्हीआर सिनेमागृहासमोर ते उभे असताना ट्रिपलसीट आलेल्या दुचाकीस्वारांपैकी एकाने सुभाष यांच्या हातातील मोबाइल हिसकावला. सनावर यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. त्यात लुटारूंनी मोबाइल रस्त्यावर फेकला. मात्र, सनावर यांनी गाडी पकडून ठेवल्याने एकाने त्यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून पोबारा केला. यात त्यांच्या हाताला पाच टाके पडले. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
दुसरी लूटमार सिडको बसस्थानकावरसोमवारी रात्री ११:३० वाजता अशाच वर्णनाच्या ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी रमेश परमेश्वर पसनूर (वय ५४) यांचा मोबाइल हिसकावून नेला. दोन्ही घटनांत लुटणारे अंदाजे १८ ते २५ वयोगट, शरीराने धडधाकट, उंची साधारण ५.५ फूट असून, मोपेड दुचाकी होती. १५ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० वाजता एमजीएम परिसरात एका कंत्राटदाराचा अशाचप्रकारे मोबाइल हिसकावून नेला होता.
दोन महिन्यांत लूटमारीच्या २५हून जास्त घटनाशहरात गेल्या दोन महिन्यांत २५ पेक्षा अधिक लूटमारीच्या घटना घडल्या. यात प्रामुख्याने स्पोर्ट्स बाईक, मोपेडस्वार लूटमार करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. क्रांती चौक, वेदांतनगर, जवाहरनगर, सातारा, सिडको, बीडबायपास, देवळाई, सोलापूर-धुळे महामार्ग, वाळूजमध्ये सर्वाधिक घटना घडत आहेत. मात्र, एकाही घटनेत स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आरोपींचा शोध घेऊ शकलेले नाही. विशेष म्हणजे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच याबाबत गांभीर्य नसल्याने अन्य अधिकारी, अंमलदारही तपास करत नसल्याचे सांगण्यात येत आहे.