अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल
By राम शिनगारे | Updated: September 22, 2022 20:35 IST2022-09-22T20:33:57+5:302022-09-22T20:35:35+5:30
या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

अल्पवयीन मुलीवर पळवून नेऊन अत्याचार; आरोपीला ठोकल्या बेड्या, गुन्हा दाखल
राम शिनगारे
औरंगाबाद: छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळून नेत, तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. छावणी पोलिसांनी मुलीचा शोध घेऊन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस अटक केली. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
आकाश सागर कांबळे (२३, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) असे आरोपीचे नाव आहे. एका महिलेने, १६ वर्षांची मुलगी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी घरातून पाणीपुरी खाण्यासाठी बाहेर गेली होती. ती परत आली नसल्याची तक्रार २१ सप्टेंबर रोजी नोंदवली. त्यानुसार निरीक्षक शरद इंगळे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक पांडुरंग डाके यांच्या पथकाने पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणाची तपासणी केली. त्यावेळी मुलगी २३ वर्षांच्या तरुणासोबत जाताना आढळली. त्याची ओळख पटवून तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीसह मुलीला शोधून काढले.
या अल्पवयीन मुलीवर आरोपीने अत्याचार केला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाच्या कलमात वाढ करीत पोक्सो कायद्यानुसार अत्याचाराचा गुन्हा नोंदवला. या आरोपीला न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे करीत आहेत.