खुलताबाद उरसास संदल मिरवणुकीने सुरुवात
By Admin | Updated: December 31, 2014 01:04 IST2014-12-31T00:05:47+5:302014-12-31T01:04:58+5:30
खुलताबाद : खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७२८ व्या उरसास संदल मिरवणुकीने सुरुवात झाली.

खुलताबाद उरसास संदल मिरवणुकीने सुरुवात
खुलताबाद : खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुन्तजबोद्दीन ऊर्फ जर जरी जर बक्ष यांच्या ७२८ व्या उरसास संदल मिरवणुकीने सुरुवात झाली.
हिंदू-मुस्लिम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत जर जरी जर बक्ष यांच्या उरसानिमित्त संदल मिरवणुकीस ख्वाजा बुऱ्हाणोद्दीन गरीब रह यांच्या दर्ग्यातून दुपारी चार वाजता सुरुवात झाली. संदल मिरवणुकीत ढोल-ताशा व वैजापूर येथील प्रसिद्ध बँड पथकांनी कला सादर केली.
त्याच बरोबर काठीच्या कवायती, तसेच वेगवेगळ्या लोकांनी इतर कवायती यावेळी सादर केल्या. संदल मिरवणुकीसाठी जिल्हाभरातून भाविक दाखल झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संदल मिरवणुकीसमोर बँड पथकाने देशभक्तीपर कव्वाली सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले होते.
रात्री दहा वाजेदरम्यान ही संदल मिरवणूक उरूस मैदानात पोहोचताच शोभेच्या दारूगोळ्यांची आतषबाजी करण्यात आली.
संदल मिरवणुकीच्या शुभारंभप्रसंगी उरूस व्यवस्था समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार बालाजी शेवाळे, सचिव मुख्याधिकारी सविता हारकर, उपाध्यक्ष तथा दर्गाह कमिटीचे अध्यक्ष अब्दुल रहेमान सुलतान बक्ष, सदस्य अॅड. कैसरोद्दीन, मुनीबोद्दीन, मोहंमद युसूफ ऊर्फ गब्बू भाई, मोहंमद नईम, आबेद जहागीरदार, गटनेता अनिस जहागीरदार, सलीम कुरेशी, रईस मुजावर, शरफोद्दीन रमजानी, फजीलत अहेमद, पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.संदल मिरवणुकीत सिल्लोडचे आ. अब्दुल सत्तार, किरण पा. डोणगावकर आदी सहभागी झाले होते. हजरत जर जरी जर बक्ष यांच्या उरसाची सुरुवात संदल मिरवणुकीने, तर सांगता ईद-ए-मिलादच्या दिवशी होते.