खटाऱ्या शिवशाही बसने जालना रोड दीड तास जाम; प्रवाशांसह, वाहनचालकांना प्रचंड त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 18:54 IST2025-09-05T18:54:32+5:302025-09-05T18:54:42+5:30

मोंढानाका उड्डाणपूल ते महावीर चौकापर्यंत वाहनांच्या लांब रांगा

Khatara Shivshahi bus blocks Jalna road for an hour and a half; causing immense trouble to passengers and drivers | खटाऱ्या शिवशाही बसने जालना रोड दीड तास जाम; प्रवाशांसह, वाहनचालकांना प्रचंड त्रास

खटाऱ्या शिवशाही बसने जालना रोड दीड तास जाम; प्रवाशांसह, वाहनचालकांना प्रचंड त्रास

छत्रपती संभाजीनगर : ऐन मोंढा नाका उड्डाणपुलाच्या चढावर गुरुवारी दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास शिवशाही बस बंद पडल्याने तब्बल दीड तास जालना रोड जाम झाला. मोंढानाका उड्डाणपूल ते महावीर चौकापर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या. परिणामी, प्रवासी आणि दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

मध्यवर्ती बसस्थानकातून छत्रपती संभाजीनगर-अकोला ही शिशवाही बस (एमएच-०९, ईएम-८७२३) सुटली. सिडको बसस्थानकाकडे जाताना इंजिनजवळील फॅनचा बेल्ट तुटला आणि गरम होऊन बस मोंढा नाका उड्डाणपुलाच्या चढावरच बंद पडली. परिणामी, बसच्या पाठीमागे आकाशवाणी, सेव्हन हिलकडे जाणाऱ्या दुचाकी, चारचाकीसह अन्य वाहनांच्या लांब रांगा लागल्या. बसच्या चालक-वाहकांनी यासंदर्भात तातडीने मध्यवर्ती बसस्थानकाला माहिती दिली.

चालक-वाहकांसह वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांना बरीच कसरत करावी लागली. बसमुळे रस्त्याची एक लेन बंद झाली होती. त्यामुळे बसच्या डाव्या बाजूने मार्ग काढताना इतर वाहनचालकांना कसरत करावी लागली. कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुपारी १:४५ वाजेच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

२० प्रवाशांचे हाल
बंद पडलेल्या बसमध्ये २० प्रवासी होते. मध्यवर्ती बसस्थानकातून दुसरी बस येईपर्यंत त्यांना बसमध्येच बसून रहावे लागले. बऱ्याच वेळेनंतर आलेल्या दुसऱ्या शिवशाही बसमधून प्रवासी रवाना झाले.

तत्काळ दुसरी बस पाठविली
बस बंद पडल्याची माहिती मिळताच तत्काळ दुसरी बस पाठविली. तसेच मेकॅनिकची टीमही पाठविली.
- अजय पाटील, आगार व्यवस्थापक, मध्यवर्ती बसस्थानक

Web Title: Khatara Shivshahi bus blocks Jalna road for an hour and a half; causing immense trouble to passengers and drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.