खरीप पिके धोक्यात
By Admin | Updated: October 3, 2014 00:32 IST2014-10-03T00:29:06+5:302014-10-03T00:32:45+5:30
कळंब : बोटावर मोजण्याइतपत गावात झालेल्या हलक्या सरी वगळता गेल्या महिन्याभरातील पावसाळा पूर्णपणे कोरडाठाक गेल्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन

खरीप पिके धोक्यात
कळंब : बोटावर मोजण्याइतपत गावात झालेल्या हलक्या सरी वगळता गेल्या महिन्याभरातील पावसाळा पूर्णपणे कोरडाठाक गेल्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेतील सोयाबीन आणि फूल, पाती लागण्याच्या अवस्थेत असलेले कापूस यासह खरीप हंगामातील सुमारे ७३ हजार हेक्टरवरील इतर पिकेही धोक्यात आली आहेत.
तालुक्यात लागवडीखालील १ लाख ८ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ६८ हजार हेक्टर क्षेत्रात साधारणपणे खरिपाचा पेरा होतो. परंतु, मागील दोन-चार वर्षात सरासरीपेक्षा पेरणी क्षेत्रात वाढ होत असून, यंदा ७८ हजार हेक्टरवर पेरा झाला आहे. ही पिके पूर्णत: मोसमी पावसावर अवलंबून आहेत. मात्र, यंदा मान्सूनच्या पावसाचे एक महिन्याने उशिरा आगमन झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी कशाबशा पेरण्या उरकल्या. यानंतर अनेक शेतकऱ्यांना बियाणे उगवणुकीची समस्या जाणवली. ज्यांचे उगवले त्यांची पिकेही पेरणीनंतर पावसाने दडी मारल्याने धोक्यात आली. आॅगस्ट अखेर दमदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, पुन्हा सप्टेंबर महिना कोरडाठाक गेल्यामुळे सोयाबीन, कापसासह सूर्यफूल, बाजरी, खरीप मका, ज्वारी ही पिकेही धोक्यात आली आहेत, उडीद, मुग, तीळ यासारखी अल्पजीवी पिके तर अधिच हातची गेली आहेत.
तालुक्यात सोयाबीनचे प्रस्तावित क्षेत्र ४२ हजार हेक्टर असताना यंदा मात्र तब्बल ५० हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नसल्याने तसेच ऐन दाणे लागण्यास सुरूवात होतानाच पावसाने दडी मारल्याने उभी पिके वाळून जात आहत. विशेत: हलक्या जमिनीवरील सोयाबीन हातचे गेले आहे. (वार्ताहर)