हिंदुत्वासाठी खैरेंनी तुरुंगात राहून दाखवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 17:50 IST2018-10-22T17:49:57+5:302018-10-22T17:50:17+5:30
वाळूज महानगर: स्वत: हिंदु धर्मरक्षक म्हणून मिरवायचे आणि तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा. हिंदुत्वासाठी त्यांनी कितीवेळा तुरुंगवास भोगला असा प्रश्न उपस्थित करत हिंदुत्वासाठी केवळ दोन तास खासदारांनी पोलीस ठाण्यातील तुरुंगात राहून दाखवावे, मी त्यांना नतमस्तक होईन, असे आ. हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी खा. चंद्रकांत खैरे यांना खुले आव्हान दिले.

हिंदुत्वासाठी खैरेंनी तुरुंगात राहून दाखवावे
वाळूज महानगर: स्वत: हिंदु धर्मरक्षक म्हणून मिरवायचे आणि तुरुंगवास दुसऱ्यांनी भोगायचा. हिंदुत्वासाठी त्यांनी कितीवेळा तुरुंगवास भोगला असा प्रश्न उपस्थित करत हिंदुत्वासाठी केवळ दोन तास खासदारांनी पोलीस ठाण्यातील तुरुंगात राहून दाखवावे, मी त्यांना नतमस्तक होईन, असे आ. हर्षवर्धन जाधव यांनी रविवारी खा. चंद्रकांत खैरे यांना खुले आव्हान दिले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी तोंडसुख घेतले.
बजाजनगरच्या मोहटादेवी मंदिर प्रांगणात रविवारी आयोजित शिवस्वराज्य बहुजन पक्ष मेळावा व प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आदित्यवर्धन जाधव, संजय आळंजकर, प्रवीण बांगड, राजाभाऊ करपे, काशिनाथ सावंत, अवचितराव मोरे, कैलास जाधव, दिनकर पवार उपस्थित होते.
आ. जाधव म्हणाले, हिंदुत्वाच्या नावाखाली लोकांची डोके भडकवायची आणि सत्ता स्वत: भोगायची. मुंबईच्या लोकांपुढे लोटांगण घालायचे, असे सांगत खा. खैरेंनी औरंगाबाद शहराचे वाटोळे केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तर राज ठाकरे दिवसा फैरी झाडतात आणि रात्रीच्या वेळी पंक्चर होताच, अशी टीकाही जाधव यांनी त्यांच्यावर केली. शिवस्वराज्य बहुजन पक्षाची भूमिका व वाटचाल याविषयी त्यांनी माहिती दिली.
आदित्यवर्धन यानेही शहरातील समस्येचा पाढा वाचत पक्षाची भूमिका विषद करुन पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले. यावेळी विविध पक्ष-संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षात जाहीर प्रवेश केला.
कैलास जाधव यांनी प्रास्ताविक तर प्रा. अनिल मगर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला प्रदीप अंभोरे, अनुप ढोबळे, सुरेश गायकवाड, ज्ञानेश्वर बनकर, बाबासाहेब जाधव, संदीप जाधव, राजेंद्र गवळी, गणेश काचोळे, गौरव डवरी, बाबपूरसाहेब थोरात मुरलीधर मते, हरिदास नेहवाल आदींसह नागरिकांची उपस्थिती होती.