सिल्लोडमध्ये 'केरळ पॅटर्न'; धोत्रा झेडपी शाळेत 'बॅकबेंचर्स'ला पूर्णविराम, ‘ढ’ विद्यार्थी हुशार होणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:09 IST2025-07-16T14:08:28+5:302025-07-16T14:09:32+5:30
धोत्रा जिल्हा परिषद शाळेत ‘केरळ पॅटर्न’चा श्रीगणेशा; धोत्रा शाळेत आता या पारंपरिक बाकांची जागा अर्धवर्तुळाकार बैठकीने घेतल्याने विद्यार्थ्यांत याचे कमालीचे कुतूहल बघायला मिळाले.

सिल्लोडमध्ये 'केरळ पॅटर्न'; धोत्रा झेडपी शाळेत 'बॅकबेंचर्स'ला पूर्णविराम, ‘ढ’ विद्यार्थी हुशार होणार!
- श्यामकुमार पुरे
सिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) : सर्व विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण सुसंवाद व्हावा, कुठलाही विद्यार्थी ‘ढ’ राहू नये, या उद्देशाने साकारलेल्या ‘केरळ पॅटर्न’ची जादू आपल्याकडील जि. प. शाळांनाही भावली आहे. सिल्लोड तालुक्यातील धोत्रा या छोट्याशा गावातील जि. प. प्राथमिक शाळेने याचा श्रीगणेशाच करून टाकल्याने याचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.
राज्य आदर्श शिक्षिका सरला कामे (कुमावत) यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, दि. १५ जुलैपासून शाळेत नव्या पद्धतीने अध्यापन सुरू झाले आहे. ‘बॅकबेंचर्स’ला आता पूर्णविराम मिळाल्याने ही फक्त आठवणीत राहणार आहे. धोत्रा शाळेत आता या पारंपरिक बाकांची जागा अर्धवर्तुळाकार बैठकीने घेतल्याने विद्यार्थ्यांत याचे कमालीचे कुतूहल बघायला मिळाले.
या संकल्पनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक सुलभ होणार असून, मागे बसणाऱ्या व दुर्लक्षित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचाही अभ्यासात सक्रिय सहभाग वाढणार आहे. ही अभिनव कल्पना शिक्षणातील समानता आणि सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. ही संकल्पना केरळमधील अनेक शाळांमध्ये आधीच राबवली गेली असून, मल्याळम चित्रपट ‘8th Standard’ मधून यास प्रेरणा मिळाली आहे.
बदल छोटा, परिणाम मोठा...
हा बदल छोटा असला तरी त्याचा परिणाम नक्कीच खूप मोठा होणार आहे. ‘बॅकबेंचर्स’ म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थी ग्रामीण भागात ‘ढ’ म्हणून ओळखले जातात. ते आता शैक्षणिक प्रवाहात मागे पडू नयेत, म्हणूनच ही बैठक पद्धती शैक्षणिक समावेशासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी केंद्रस्थानी यावा, याकरिता हा प्रयोग शिक्षणाच्या न्याय्य आणि सहभागी प्रक्रियेला चालना देणारा आहे.
ही अभिनव कल्पना शिक्षणातील समानता आणि सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, तर प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेत हा प्रयोग नक्कीच करावा.
- सरला कामे (कुमावत), राज्य आदर्श शिक्षिका, जि. प. प्रा. शाळा धोत्रा, जि. छत्रपती संभाजीनगर