आयुष्याच्या शिदोरीवर ‘केबीसी’चा डल्ला !
By Admin | Updated: July 17, 2014 00:26 IST2014-07-17T00:06:34+5:302014-07-17T00:26:07+5:30
मोहन बोराडे, सेलू सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे.

आयुष्याच्या शिदोरीवर ‘केबीसी’चा डल्ला !
मोहन बोराडे, सेलू
शासकीय सेवेत जमविलेली सेवानिवृत्तीची रक्कम, मुलाबाळांच्या शिक्षण, लग्नकार्यासाठी जमा केलेली पुंजी तर प्रसंगी मालमत्ताही विकून अनेकांनी तीनपट आमिषापोटी केबीसीत रक्कम गुंतवल्याचे समोर येत आहे. केबीसीचा घोटाळा उघड झाल्यानंतर तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले असून, या घोटाळ्यासंदर्भात जागोजागी चर्चा सुरू आहे. तालुक्यातील गुंतवणुकीचा आकडा कोट्यवधी रुपयांचा घरात असल्याचे समजते.
सेलू तालुक्यात दोन वर्षांपासून केबीसी कंपनीने एजंटामार्फत आपले जाळे पसरविले. हजारो नागरिकांकडून करोडो रुपयांची माया जमा केली. सुरुवातीच्या काळात गुंतविलेल्या रक्कमेचे सांगितल्याप्रमाणे हप्ते गुंतवणुकदारांना मिळाले. त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करीत या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत गेली. शेतकरी, व्यापारी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनी या कंपनीत पैसे गुंतविले. सहा महिन्यापांसून गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा मिळत नव्हता. परंतु आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर कोणीही तक्रार नोंदविली नाही. परंतु कंपनीचे प्रमुख पसार झाल्याच्या बातम्या आल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.
सेलू व परिसरात अल्पावधीत दामदुप्पट रक्कमेचे अमिष दाखवून केबीसी कंपनीने एजंटामार्फत आपले जाळे वाढविले. त्यामुळे सेलू येथे अनेक मेळावेही या कंपनीने घेतले. काही एजंटांना विदेशवारीही घडविली. त्यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुण या कंपनीच्या जाळ्यात अडकले. मित्र कंपनी, नातेवाईकांनाही त्यांनी या कंपनीत गुंतवणुकीसाठी आग्रह धरला. त्यामुळे जवळचा माणूस पाहून अनेकांनी मोठ्या रकमा कंपनीत गुंतविल्या. परंतु काही दिवसांपासून कंपनीकडून पैसे वेळेवर येत नसल्यामुळे गुंतवणुकदार हवालदिल झाले व एजंटांना पैशांची मागणी करू लागले आहेत. विशेष करून नोकरदार महिला व व्यापाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर या कंपनीत गुंतवणूक आहे. महिलांनीही या कंपनीत मोठ्या आशेने गुंतवणूक केली आहे. दरम्यान रक्क्म परत मिळेल की नाही? या विवंचनेत गुंतवणूकदार आहेत.
सेलूत अनेक कंपन्यांचे पेव
केबीसीसह अल्पावधीत दामदुप्पट रक्कम देणाऱ्या कंपन्यांचे सेलू व परिसरात मागील काही वर्षापासून पेव फुटले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी व नोकरदार मंडळींना आपल्या जाळ्यात अडकवून करोडो रुपये अनेक कंपन्यांनी गिळंकृत केले आहेत. ग्रामीण व शहरी भागातील काही बोलक्या मंडळींना हाताशी धरून दामदुप्पट रक्कम देण्याच्या अमिषाने शेकडो नागरिकांनी या कंपन्यांमध्ये पैसे गुंतविले. सामान्य एजंटही चारचाकी गाड्यात फिरू लागले. अनेकांची देहबोली बदलली, राहणीमानही बदलू लागले. हे पाहून अनेक जण या कंपनीच्या मोहात अडकले. परिणामी लवकरच या कंपन्यांनी गाशा गुंडाळल्याने अनेकांना गाव सोडण्याची वेळ आली आहे. दरम्यान सेलू व परिसरात अशा कंपन्यांमध्ये शेकडो नागरिकांनी कोट्यवधी रुपये गुंतवविलेले आहेत.