केबीसीने घातला कोट्यवधींचा गंडा
By Admin | Updated: July 16, 2014 00:46 IST2014-07-16T00:14:19+5:302014-07-16T00:46:31+5:30
विजय चोरडिया, जिंतूर अल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़

केबीसीने घातला कोट्यवधींचा गंडा
विजय चोरडिया, जिंतूर
अल्पावधित दाम दुप्पट देण्याचे आमिष दाखवून जिंतूर तालुक्यातील शेतकरी व कर्मचाऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून केबीसी कंपनीने गाशा गुंडाळला आहे़ यामुळे हजारो गुंतवणूकदारांचे पैसे मात्र अडकून पडले आहेत़ मागील दोन वर्षांपासून केबीसीने जिंतूर तालुक्यात जोरदार मार्केटींग केले़
एजंटांची साखळी निर्माण करून ग्रामीण भागापर्यंत एजंटांचे जाळे नेमले़ १७ हजार २०० रुपयांत ५१ हजार रुपये मिळवा किंवा ८६ हजारांत ३ लाख ६ हजार रुपये मिळवा, असे अमिष दाखवून गुंतवणूकदारांना आकर्षित केले़ तालुक्यामध्ये ४० ते ५० एजंट असून, १ हजारापेक्षा जास्त लोकांनी कंपनीत गुंतवणूक केली आहे़ हा आकडा १० कोटीपेक्षा जास्त आहे़ १ महिन्यापूर्वी केबीसीने गाशा गुंडाळला हे जवळपास निश्चित झाले होते़ तेव्हापासूनच गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास कमी झाला़ परंतु, एजंटांनी गुंतवणूक करताना वेगवेगळी आमिषे दाखविली़ काही एजंटांनी स्वत: जबाबदारी घेऊन पैसे बुडाले तर परत करू असे आश्वासन दिले होते़ यामुळे लोकांनी विश्वास ठेऊन कोट्यवधी गुंतवले़ याचाच परिणाम कंपनीला मोठ्या प्रमाणावर रक्कम मिळाल्याने ही रक्कम घेऊन कंपनीचे मुख्य संचालक व अन्य पसार झाले आहेत़ विशेषत: तालुक्यातील ग्रामीण भागापर्यंत केबीसीचे जाळे पोहचले आहे़ प्रत्येक गावातून किमान २० त २५ नागरिकांनी यात गुंतवणूक केली़ काहींनी घरातील किडूनमिडूक विकून तर काहींनी दागिने गहान ठेऊन तर काहींनी व्याजबट्टयाचे पैसे शेती गहान ठेऊन काढले व केबीसीत गुंतवले़ केबीसीने आता पोबारा केल्यामुळे या नागरिकांपुढे कर्ज फेडण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे़
एजंट आले गोत्यात
तालुक्यातील नागरिकांनी कंपनीत पैसे गुंतविताना एजंटाच्या भरोस्यावर गुंतवणूक केली होती़ गुंतवणुकीच्या वेळी एजंटांनी पैसे परत करण्याचे आमिष संबंधितांना दिले होते़ आता कंपनी बुडाल्याने गुंतवणूकदार एजंटाच्या दारात खेटे घालत आहेत़ एजंटांनी गुंतवणूकदारांना आमिष दाखविल्यानेच कोट्यवधी रुपयांना गुंतवणूकदार बुडाले आहेत़
गुंतवणुकीत महिलांचे प्रमाण जास्त
केबीसी कंपनीत ज्या गुंतवणूकदारांनी रक्कम गुंतवली़ त्यात महिलांचे प्रमाण मोठे आहे़ अनेक महिलांनी घरच्या मंडळींना अंधारात ठेऊन गुंतवणूक केली तर काहींनी स्वत:चे दागिने परस्पर ठेऊन कंपनीत पैसे भरले़ कंपनी बंद पडल्याने या महिलांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे़