कारगिल विजयदिन उत्साहात
By Admin | Updated: July 27, 2014 01:19 IST2014-07-27T01:02:19+5:302014-07-27T01:19:51+5:30
औरंगाबाद : देशभक्तीमय वातावरणात आज सकाळी गारखेडा परिसरातील नाथ प्रांगण येथील कारगिल स्मृतिवनात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला.

कारगिल विजयदिन उत्साहात
औरंगाबाद : देशभक्तीमय वातावरणात आज सकाळी गारखेडा परिसरातील नाथ प्रांगण येथील कारगिल स्मृतिवनात कारगिल विजय दिन साजरा करण्यात आला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अतुल सावे, रा. स्व. संघाचे डॉ. उपेंद्र अष्टपुत्रे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना ‘भारत माता की जय’ चा निनाद केला. उपस्थित मुला- मुलींनी त्यांना जोरदार प्रतिसाद दिला. डॉ.अष्टपुत्रे, अतुल सावे, कॅप्टन सुर्वे व ए. के. पाठक यांची यावेळी भाषणे झाली. गोविंद केंद्रे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
कॅप्टन सुरेंद्र सुर्वे, नायक भानुदास नरवटे, कर्नल रमेश वाघमारे, विंग कमांडर टी. आर. जाधव, मेजर पाटील, कॉर्पोरेटर पॉल भाटिया, मेजर पाठक यांचा यावेळी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा व अन्य पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी, कारगिल विजय दिनाची आठवण म्हणून राजेंद्र दर्डा व पाहुण्यांच्या हस्ते मशाल पेटविण्यात आली. नगरसेवक पंकज भारसाकळे यांनी प्रास्ताविक केले. गेल्या चार वर्षांपासून भारसाकळे यांच्या संयोजनत्वाखाली कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल स्मृतिवनात असा कार्यक्रम आयोजित केला जात असतो.
ज्ञानप्रकाश विद्यामंदिर, गजानन बहुउद्देशीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मॉडर्न कन्या विद्यालय, जय अंबिका विद्यालय, अंकुर बालक मंदिर, माँ शारदा प्राथमिक शाळा, छत्रपती हायस्कूल, सुधाकरराव नाईक हायस्कूल, नरेंद्र विद्यामंदिर, कलावती चव्हाण हायस्कूल, या शाळांच्या मुला- मुलींची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पीईएसचे प्रा. महादेव उबाळे लिखित ‘राष्ट्रध्वजाची संहिता’ या ग्रंथाचे विमोचन राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. सिडको ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, एस. पी. जवळकर, राधाकृष्ण गायकवाड, राजाराम मोरे, रंगनाथ खेडेकर, सुनील त्रिभुवन, मुकेश सोनवणे, अमोलकचंद मुगदिया, राहुल चव्हाण तसेच त्या - त्या शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांची उपस्थिती होती.
मनपाने कारगिल स्मृतिवन उभारावे...
नगरसेवक पंकज भारसाकळे यांनी नाथ प्रांगणातील मोकळी जागा वाचविण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत. याठिकाणी महापालिकेने कारगिल स्मृतिवन उभारावे, अशी त्यांची स्वत:ची मागणी आहे आणि त्यासाठी त्यांचा पाठपुरावाही चालू आहे. आजच्या कार्यक्रमात पंकज भारसाकळे यांची ही मागणी राजेंद्र दर्डा यांच्यासह सर्वांनीच उचलून धरली.
सीमेवर जीव धोक्यात घालून लढणाऱ्या जवानांमुळेच आज तुम्ही शाळेत शिकू शकता, असे मुलांना उद्देशून सांगत राजेंद्र दर्डा यांनी कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. माजी सैनिकांसाठी राज्याच्या विविध भागांत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची थोडक्यात माहितीही त्यांनी दिली.
देशभक्तीपर गाण्यांना टाळ्यांची साथ
राहुल चोथमल व संचाने देशभक्तीपर गाणी सादर करून संपूर्ण वातावरण भारावून टाकले होते. चोथमल यांच्या गाण्यावर शालेय विद्यार्थ्यांनी कधी हातातील तिरंगी झेंडे फिरवून, तर कधी लयबद्ध टाळ्या वाजवून साथ दिली. शिवाय ‘भारत माता की जय’चा निनाद सतत घुमत होता.