कन्हेरवाडीची ‘सिंगल फेज’ योजना नावालाच
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-15T23:49:01+5:302014-07-16T01:24:00+5:30
परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही

कन्हेरवाडीची ‘सिंगल फेज’ योजना नावालाच
परळी: शहरापासून जवळच असलेल्या कन्हेरवाडी गावात ‘सिंगल फेज’ योजनेच्या ८ डीपी उभ्या केल्या. मात्र अद्यापही या सिंगल फेज योजनेच्या डीपीवरुन कनेक्शन सुरू केलेले नाही. मागील चार वर्षांपासून ही योजना मंजूर झालेली असूनही अद्याप कार्यान्वित नाही. त्यामुळे ही योजना केवळ नावालाच आहे, की काय? असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
परळी-अंबाजोगाई राज्य रस्त्यावर असलेल्या कन्हेरवाडी येथे बारा हजार लोकसंख्या आहे. या गावात ४ वर्षांपूर्वी सिंगल फेज योजनेंतर्गत विद्युत खांब व डीपी बसविण्यात आल्या आहेत. मात्र यावरुन अद्यापही वीजपुरवठा सुरू केलेला नाही. त्यामुळे सकाळी ४ ते ११ व दुपारी ४ ते ९.३० या दरम्यान वीजपुरवठा खंडित असतो. ही योजना कार्यान्वित न झाल्याने अनेक अडचणींचा सामना येथील ग्रामस्थांना करावा लागतो. भारनियमनाने वैतागलेल्या ग्रामस्थांनी महावितरण कंपनीच्या अभियंत्याकडे निवेदनाद्वारे आपली तक्रार केली. लवकरात लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा एच.यू. फड, विकास मुंडे, समाधान मुंडे, विष्णू फड, बालासाहेब फड यांनी दिला आहे.
योजना का सुरू नाही?
जिरेवाडी व कन्हेरवाडीला सिंगल फेज योजना सुरु का केली जात नाही? कन्हेरवाडीला अंधारात का ठेवले जाते? किती दिवस येथील ग्रामस्थांनी अंधाराचा सामना करायचा? विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण ? यासारखे अनेक प्रश्न सामाजिक कार्यकर्ते एच.यू. फड यांनी उपस्थित केले आहेत. ही योजना सुरू न करण्यात अधिकारी, कर्मचारी यांचाही समावेश आहे, असा आरोप फड यांनी केला असून, दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत शाखा अभियंता भालचंद्र चाटे म्हणाले, कन्हेरवाडी सिंगल फेज योजनेंतर्गत जिरेवाडी गावाचाही समावेश आहे. जिरेवाडीत डीपी बसविल्यास जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे ही सिंगल फेज योजना कार्यान्वित होत नाही, असे सांगितले.
जिरेवाडी ग्रामस्थांचा डीपीसाठी विरोध नाही
शाखा अभियंता चाटे म्हणाले होते, जिरेवाडी गावात सिंगल फेजसाठी डीपी बसविण्यास जागा उपलब्ध नाही. मात्र जिरेवाडी ग्रामस्थांचा डीपीसाठी कुठलाही विरोध नाही. येथील ग्रामस्थांनाही बारा तास भारनियमनाचा सामना करावा लागतो. या योजनेला आमचा विरोध नसल्याचे जिरेवाडीचे माजी सरपंच तुकाराम मुंडे यांनी सांगितले.
भारनियमनाला नागरिक वैतागले
सकाळी ७ व सायंकाळी ५ तास भारनियमन केले जात असल्याने या भारनियमनाला ग्रामस्थ वैतागले आहेत. ज्या वेळेत वीज आहे अशा वेळेतही वीज गुल होत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. लवकरात लवकर ही योजना सुरू करुन ग्रामस्थांचे हाल थांबवावेत, अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे. (वार्ताहर)